करोना संकटामुळे सध्या शाळा बंद असून ऑनलाइन शिक्षणावर भर दिला जात आहे. मात्र यामध्ये गरीब विद्यार्थ्यांना अनेक अडचण येत असून वायफाय, स्मार्टफोन अशा समस्या जाणवत आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे जिथे ऑनलाइल शिक्षणासाठी वडील स्मार्टफोन विकत घेण्यात असमर्थ असल्याने मुलाने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. तामिळनाडूत हा प्रकार घडला आहे.

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, दहावीत शिकणाऱ्या मुलाने घरामध्येच आत्महत्या केली. मुलाचे वडील काजू शेतकरी आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “माझ्या मुलाने ऑनलाइनद शिकवणीसाठी मोबाइल मागितला होता. मी त्याला काजू विकल्यानंतर पैसे येतील त्यानंतर मोबाइल विकत घेऊन देतो असं सांगितलं. पण यावर त्याचा राग अनावर झाला”. पोलिसांनी संशयास्पद मृत्यूची नोंद केली असून तपास सुरु आहे.

करोना संकटामुळे हातावर पोट असणाऱ्या अनेक कुटुंबासमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यातच ऑनलाइन शिकवणीवेळी मुलभूत गोष्टींचा तुटवडा कुटुंबांना जाणवत आहे. त्यातून अनेक मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

हिमाचल प्रदेशात मुलीच्या शाळेची फी भरण्यासाठी तसंच स्मार्टफोन विकत घेण्यासाठी वडिलांनी गाय विकल्याची घटना समोर आली होती. सोशल मीडियावर ही घटना व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाकडून त्यांना मदत देण्यात आली. दुसरीकडे जुलै महिन्यात ऑनलाइन शिकवणीसाठी स्मार्टफोन विकत घेण्यावरुन मुलीसोबत झालेल्या वादानंतर ५० वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती.