भारताची संस्कृती बहुआयामी आहे. आपल्या संस्कृतीची हिच परंपरा पुढे नेत 16 वर्षांच्या प्रियव्रत पाटीलने इतिहास रचला आहे. सर्वात कमी वयात ‘महापरीक्षा’ उत्तीर्ण होण्याचा मान त्याने पटकावला आहे. वयाच्या 16 व्या वर्षी प्रियव्रतने तेनाली परीक्षेच्या (महापरीक्षा) विविध 14 स्तरांमध्ये घवघवीत यश मिळवलं आणि सर्वात कमी वयात ‘महापरीक्षा’ उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला. या यशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याचं ट्विटरद्वारे अभिनंदन केलंय. तेनाली परीक्षेचे 14 स्तर असतात आणि वर्षातून दोन वेळेस ही परीक्षा होते. जे विद्यार्थी शास्त्रांचं शिक्षण घेतात त्यांच्यासाठी ही परीक्षा असते.


“प्रियव्रतने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचं अभिनंदन. त्याने मिळवलेलं यश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल”, असं ट्विट करत मोदींनी प्रियव्रतच्या पाठीवर कौतुकाची थाप दिलीये. अन्य एका ट्विटला उत्तर देताना मोदींनी प्रियवतचं अभिनंदन करणारं हे ट्विट केलं. “काल श्रीमती अपर्णा आणि श्री देवदत्ता पाटील यांच्या 16 वर्षांच्या मुलाने इतिहास रचला. आपल्या वडिलांकडून वेद व न्यायाचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर त्याने सर्व व्याकरण महाग्रंथांचं श्री मोहन शर्मा यांच्याकडून शिक्षण घेतलं. यासोबतच तेनाली परीक्षेच्या (महापरीक्षा) विविध 14 स्तरांमध्ये घवघवीत यश मिळवून सर्वात कमी वयात ‘महापरीक्षा’ उत्तीर्ण होण्याचा मान त्याने मिळवला”, असं ट्विट Chamu KrishnaShastry या हँडलवरुन करुन पंतप्रधान मोदींना टॅग करण्यात आलं होतं. त्याला उत्तर देताना पंतप्रधानांनी प्रियव्रत पाटीलचं अभिनंदन केलं.

ही परीक्षा देणारे विद्यार्थी आपल्या गुरूंसोबत देशाच्या विविध भागात राहतात आणि पारंपारिक ‘गृह गुरुकुल’ प्रणालीनुसार शिकतात. वर्षातून दोनदा सर्व गुरु व विद्यार्थी त्यांच्या लेखी व तोंडी परीक्षेसाठी तेनाली येथे एकत्र येतात. विद्यार्थ्यांच्या 5-6 वर्षांच्या अभ्यासानंतर कांची मठाच्या देखरेखीखाली महापरीक्षा’ घेतली जाते. गेल्या 40 वर्षांमध्ये, ‘तेनाली परीक्षा’ शास्त्र अभ्यासाच्या क्षेत्रातील एक महत्त्वाची संस्था ठरली आहे. ‘इंडिक अकादमी’ सध्या विविध शास्त्राच्या अभ्यासासाठी 40 विद्यार्थ्यांना मदत करतेय.