पाकिस्तानात पेशावर येथे आर्मी पब्लिक स्कूलवरील हल्ल्यात १३२ मुलांसह १४१ जणांना दहशतवाद्यांनी ठार केल्यानंतर पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी दहशतवादाच्या प्रकरणांमध्ये फाशीच्या शिक्षेवरील बंदी उठवली होती. आता पाकिस्तानमध्ये एकूण १७ दहशतवाद्यांना फाशी देण्यात येणार आहे.
शरीफ यांनी पेशावर येथील हल्ल्यानंतर सर्वपक्षीय बैठकीत फाशीची शिक्षा दहशतवाद्यांसाठी पुन्हा लागू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. माध्यमांमधील बातम्यांनुसार कराची, फैसलाबाद, लाहोर, सक्कर येथे तुरुंग अधिकाऱ्यांना १७ दहशतवाद्यांना फाशी देण्याची तयारी पूर्ण करण्यास सांगितले आहे.
या अतिरेक्यांमध्ये अकील ऊर्फ उस्मान हा रावळपिंडी येथील लष्करी मुख्यालयातील हल्ल्याचा सूत्रधार फैसलाबाद तुरुंगात आहे. त्याला फाशी दिले जाणार आहे. माजी लष्करशाह परवेझ मुशर्रफ यांच्या हत्येचा प्रयत्न करणारा नियाझ महंमद, माजी पंतप्रधान शौकत अजिज यांच्यावर हल्ला करणारा नूर बादशाह, हैदराबाद तुरुंगात असलेला व अमेरिकी पत्रकार डॅनियल पर्ल याला ठार करणारा शेख ओमर सईद व फजल हमीद यांना फाशी दिले जाणार आहे.
पाकिस्तानमध्ये २००८ मध्ये शेवटची फाशी देण्यात आली होती, त्यानंतर फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली होती. दरम्यान, लष्करप्रमुख राहील शरीफ यांनी सहा दहशतवाद्यांच्या प्रलंबित फाशी आदेशावर स्वाक्षरी केली. येत्या ४८ तासांत त्यांना फाशी दिले जाणार आहे.