उत्तर प्रदेशात गाझीपूर येथे एका पोलिसाचा जमावाच्या हिंसाचारात मृत्यू झाल्याच्या प्रकरणी पोलिसांनी १९ जणांना अटक केली आहे. शुक्रवारी तेथे पंतप्रधान मोदी यांची सभा झाली होती त्यानंतर परत जात असताना या पोलिसास ठार करण्यात आले.
पोलिस महासंचालक ओ.पी.सिंह यांनी सांगितले की, सुरेश प्रताप सिंह वत्स हा हेड कॉन्स्टेबल हिंसाचारात मारला गेला. पंतप्रधान मोदी यांच्या सभेहून परतताना निदर्शकांनी काही वाहनांवर दगडफेक केली होती. त्यात या पोलिसाचा डोक्याला दगड लागल्याने मृत्यू झाला होता. हा पोलिस निदर्शकांमुळे वाहतुकीचा खोळंबा झाला असताना तो सोडवण्यासाठी गेला होता. सुरेश प्रताप सिंह वत्स यांचा गाझीपूर येथे दगडफेकीत झालेला मृत्यू दुर्दैवी आहे. एकूण तीन प्रकरणात १९ जणांना अटक केली असून खून प्रकरणात अकरा जणांना अटक केली आहे. संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असे पोलिस महासंचालक सिंह यांनी सांगितले.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार कॉन्स्टेबल वत्स हे धरणे आंदोलन करणाऱ्या जमावाला समजावण्यासाठी गेले असता जमावाने त्यांना जबर मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. राष्ट्रीय निशाद पार्टी व सुहेलदेव भारतीय समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली.
गाझीपूरचे पोलिस अधीक्षक यशवीर सिंह यांनी सांगितले,की निदर्शक कार्यकर्ते हे राष्ट्रीय निशाद पार्टीचे होते. त्यांना सभेच्या ठिकाणी जाण्यास अटकाव केला असता दगडफेक करण्यात आली. पंतप्रधान गाझीपूर येथून गेल्यानंतर वाहतूक कोंडी झाली होती, त्या वेळी कार्यक्रमाच्या ठिकाणाहून परतणाऱ्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली. पोलिस आता चित्रफिती तपासत असून निदर्शकांचा शोध घेत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलिसाच्या पत्नीस ४० लाख व आईवडिलांना १० लाख रूपये नुकसानभरपाई जाहीर केली आहे. जिल्हा दंडाधिकारी व पोलिस अधीक्षक यांनी संबंधित गुन्हेगारांना पकडून शिक्षा करावी असे आदेश त्यांनी जारी केले आहेत.
गेल्याच महिन्यात बुलंदशहर येथे जमावाच्या हिंसाचारात पोलिस निरीक्षक सुबोध कुमार सिंह हे मारले गेले होते, त्यानंतर आता पुन्हा एकदा दगडफेकीत पोलिसाचा मृत्यू झाला आहे.