ब्लू व्हेल चॅलेंजनंतर आता आणखी एका गेम चॅलेंजमुळे केरळमधल्या २१ वर्षीय तरुणाला जीव गमवावा लागला आहे. हा तरुण टु व्हिलर राइड चॅलेंजचा बळी ठरला आहे. केरळमधल्या महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या मिथुनचा टु व्हिलर राइड चॅलेंज पूर्ण करताना जीव गेला आहे. बंगळुरू- पुणे राष्ट्रीय महामार्गावर पहाटे चारच्या सुमारास ट्रकला धडक बसल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. मिथुनला वेगानं गाडी पळवण्याची सवय होती. कोईंबतूरला जातो असं सांगून मंगळवारी संध्याकाळी तो घरातून निघाला होता अशी माहीत त्याच्या आईनं दिली. त्यानं Saddle Sore challenge मध्ये भाग घेतला होता. अमेरिकेतली एका संस्थेनं हे चॅलेंज आयोजित केलं होतं.

काय आहे Saddle Sore challenge?
या चॅलेंजनुसार एका दुचाकीस्वाराला २२ तासांच्या आत दीड हजार किलोमीटर अंतर पार करायचं असतं.

मिथुननं हे चॅलेंज स्विकारलं होतं. यासाठी काही चॉकलेट्स आणि मोजक्या खाण्याच्या वस्तू सोबत ठेवून तो संध्याकाळच्या सुमारास घरातून निघाला. पहाटे चारच्या सुमारास तो ट्रकला मागून धडकला, आणि यातच त्याचा मृत्यू झाल्याची माहीत पोलिसांनी दिली आहे. पोलिसांना मिथुनजवळ नकाशा सापडला आहे. त्याच्या घरापासून ते बंगळुरू -पुणे अंतर तो २२ तासांत पार करणार होता. मिथुन ट्रकच्या मागून वेगानं येत होता. ट्रक चालकानं एमर्जन्सी ब्रेक लावल्यावर मागून वेगात येणाऱ्या मिथुनची धडक ट्रकला बसली आणि जागीच त्याचा मृत्यू झाला अशी माहितीही पोलिसांनी दिली.