गेल्या २४ तासांत सर्वाधिक ४,३२९ बळी

नवी दिल्ली : करोनाच्या दुसऱ्या लाटेत मृतांच्या दैनंदिन संख्येत होणारी वाढ चिंताजनक आहे, परंतु दैनंदिन रुग्णसंख्या मात्र घटू लागल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून दिसत आहे.

देशभरात गेल्या २४ तासांत आजपर्यंतचे सर्वाधिक ४,३२९ रुग्ण दगावले आहेत. त्यामुळे मृतांची एकूण संख्या दोन लाख ७८ हजार ७१९ वर पोहोचली आहे. मृत्यूसंख्येतील ही वाढ २८ एप्रिलपासून सातत्याने तीन हजारांहून अधिक नोंदवली जात आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत आणखी दोन लाख ६३ हजार नागरिकांना संसर्ग झाला असून ही गेल्या २८ दिवसांमधील सर्वात (पान २ वर) (पान १ वरून) कमी संख्या आहे, असे मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

गेल्या आठवडय़ाभरात २५ लाख रुग्णांची, तर ३२ हजार मृत्यूंची नोंद झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी दिली. गेल्या दोन दिवसांत रुग्णवाढ सुमारे ७० हजारांनी कमी झाली, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नमुना चाचण्यांमध्ये वाढ केल्यानंतरही संसर्गदरात घट झाली आहे. गेल्या १४ आठवडय़ांमध्ये (सुमारे तीन महिने) नमुना चाचण्यांमध्ये २.५ पटीने वाढ केली गेली. नमुना चाचण्यांमध्ये वाढ होत असताना ३० मार्च रोजी संसर्गदर ९.६ टक्के होता, तो २१.४ टक्क्यांवर पोहोचला होता. गेल्या आठवडय़ात सरासरी संसर्गदर मात्र १६.९ टक्क्यांवर आला. गेल्या २४ तासांमध्ये देशातील सरासरी संसर्गदर १४.१० टक्क्यांपर्यंत खाली आला आहे, अशी माहिती अगरवाल यांनी दिली. त्या आधारावर, दुसऱ्या लाटेत दैनंदिन रुग्णवाढ सपाटीला जात असल्याचे करोना कृतिगटाचे प्रमुख व निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही. के. पॉल यांनी सांगितले.

९८ टक्क्यांना संसर्गाचा धोका

दुसऱ्या लाटेत रुग्णवाढीचा वेग मंदावला असला तरी, देशातील फक्त १.८ टक्के लोकांनाच संसर्ग झाला आहे. त्यामुळे अजूनही ९८ टक्के लोकसंख्येला करोनाबाधित होण्याचा धोका कायम असल्याचा इशारा आरोग्य मंत्रालयाने दिला. करोना संसर्गाची तीव्रता कमी करण्यासाठी लसीकरण हाच उत्तम उपाय असल्याचे केंद्राकडून तसेच तज्ज्ञांकडून सांगितले जात असले तरी आत्तापर्यंत १८.२२ कोटी लोकांचे लसीकरण झाल्याचे लव अगरवाल यांनी सांगितले.

देशातील परिस्थिती

* गेल्या तीन आठवडय़ांत १९९ जिल्ह्य़ांमध्ये रुग्णवाढ, सध्या संसर्गदर घसरणीला.

* देशात ३३ लाख ५३ हजार उपचाराधीन रुग्ण.

* महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये एक लाखांपेक्षा जास्त उपचाराधीन रुग्ण.

* दहा राज्यांमध्ये ५० हजार ते एक लाख, तर १८ राज्यांमध्ये ५० हजारांपेक्षा कमी उपचाराधीन रुग्ण.

* करोनामुक्त होण्याचे प्रमाण ३ मे रोजी ८१.७ टक्के होते, आता ते ८५.६ टक्क्यांवर

दिलसादायक!

* गेल्या २४ तासांत दोन लाख ६३ हजार नव्या बाधितांची नोंद.

* सलग दुसऱ्या दिवशी दैनंदिन रुग्णवाढ तीन लाखांपेक्षा कमी.

* दैनंदिन रुग्णवाढ ७ मे रोजी ४.१४ लाख, आता २७ टक्क्यांनी घट.

राज्यात २८,४३८ नवे बाधित

मुंबई : राज्यात दिवसभरात २८,४३८ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ६७९ जणांचा मृत्यू झाला. गेल्या २४ तासांत मुंबई ९६१, नाशिक जिल्हा १२८४, नाशिक शहर ९६२, नगर २०४५, पुणे शहर १०९०, उर्वरित पुणे जिल्हा २०५३, पिंपरी-चिंचवड ५६२, सोलापूर २१८५, सांगली १९०५, अमरावती ८७३, नागपूर शहर ६००, उर्वरित नागपूर जिल्हा ५४९ नवे रुग्ण आढळले. राज्यात चार लाख १९ हजार उपचाराधीन रुग्ण आहेत.