नियंत्रण रेषा पार करुन भारतात आलेल्या चिमुरड्याला लष्कराने पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या हवाली केलं आहे. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील ११ वर्षांचा हा चिमुरडा जम्मू काश्मीरमधील पूंछ येथून भारतात आला होता. चार दिवसांपुर्वी चुकून भारतात आलेल्या या चिमुरड्याला पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या हवाली करण्यात आलं आहे.

२४ जून रोजी पुंछमधील देगवार परिसरात लष्कर जवानांना मोहम्मद अब्दुल्लाह सापडला होता. त्याच दिवशी लष्कराने त्याला जम्मू काश्मीर पोलिसांच्या हवाली केलं होतं. पोलिसांनी त्याला त्याच्या घरी पाठवण्यासाठी सर्व औपचारिकता पूर्ण केल्या.

माणुसकीच्या आधारे मोहम्मद अब्दुल्लाह याला त्याच्या घऱी पाठवण्याचा निर्णय़ घेण्यात आल्याचं संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितलं आहे. यामुळे भारत पाकिस्तानातील संबंध सुधारण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. चिमुरड्याला परत पाठवताना नवीन कपडे आणि मिठाईदेखील देण्यात आली.