देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना राजधानी दिल्ली मात्र, हिंसाचार ढवळून निघाली. शेतकरी आणि पोलीस यांच्यात झालेल्या धुमश्चक्रीनंतर आरोप-प्रत्यारोपांचा रणधुमाळी रंगली आहे. ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागल्यानंतर शेतकऱ्यांनी लालकिल्ल्यावर निशाण ए साहिब ध्वज फडकावला. त्यावरून बरंच वादंग सुरू असताना दीप सिद्धू हे नाव समोर आलं आहे. दीप सिद्धू याने शेतकऱ्यांना भडकावल्याचा आरोप भारतीय किसान युनियनचे हरयाणातील प्रमुख गुरनाम सिंह चाडूनी यांनी केला. खरंच दीप सिद्धू याने शेतकऱ्यांना भडकावलं का आणि तो कोण आहेत, हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

जवळपास दोन महिन्यांपासून शांततेत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला ऐन प्रजासत्ताक दिनी गालबोट लागलं. ट्रॅक्टर रॅलीदरम्यान शेतकरी व पोलीस आमने-सामने आल्यानंतर हिंसेचा उद्रेक झाला. यातच शेतकऱ्यांच्या एका गटाने लाल किल्ल्याकडे कूच करत किल्ल्यावर ध्वज फडकावला. तिरंगा उतरवून ध्वज फडकावल्याचा अफवा पसरल्या होत्या. मात्र, तिरंगा न उतरवता आंदोलक शेतकऱ्यांनी ध्वज फडकावल्याचं नंतर समोर आलं.

VIDEO: शेतकऱ्यांपासून वाचण्यासाठी पोलिसांनी लाल किल्ल्यावरुन मारल्या उड्या

लाल किल्ल्याजवळ झालेल्या या घटनेनंतर आंदोलक शेतकऱ्यांविरुद्ध टीकेचा सूर उमटला. मात्र, ध्वज फडकावणाऱ्या शेतकऱ्यांना पंजाबी गायक दीप सिद्धू याने भडकावल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे. “दीप सिद्धूने शेतकऱ्यांचं नेतृत्व केलं आणि त्यांना लाल किल्ल्याकडे घेऊन गेला. शेतकऱ्यांची लाल किल्ल्याकडे जाण्याची अजिबात इच्छा नव्हती,” असं गुरनाम सिंह चाडूनी यांनी म्हटलं आहे. स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव यांनीही दीप सिद्धू याला लाल किल्ल्यावरील घटनेसाठी जबाबदार ठरवलं आहे.

आणखी वाचा- दिल्ली ट्रॅक्टर परेड हिंसाचार : ८३ पोलीस कर्मचारी जखमी; चार गुन्हे दाखल

दरम्यान, दीप सिद्धू कोण आणि त्याने खरंच आंदोलक शेतकऱ्यांना भडकावलं का?, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. शेतकरी नेत्यांकडून होत असलेल्या आरोपानंतर दीप सिद्धूने भूमिका स्पष्ट केली आहे. “आंदोलन करण्याच्या लोकशाही अधिकाराचा वापर करूनच आम्ही फक्त निशाण साहिब ध्वज फडकावला. तिरंगा हटवला नव्हता,” दीप सिद्धूने म्हटलं आहे.

दीप सिद्धू कोण आहे?

दीप सिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता आहे. १९८४ मध्ये पंजाबमधील मुख्तसार जिल्ह्यात त्याचा जन्म झाला. त्याने कायद्याची पदवी घेतली. किंगफिशर मॉडेल हंट पुरस्कार मिळवण्यापूर्वी तो बार कॉउन्सिलचा सदस्यही राहिला आहे. २०१५ मध्ये दीप सिद्धूचा रमता जोगी हा पहिला सिनेमा पदर्शित झाला. जोरा दस नबरिया या सिनेमानं त्याला प्रसिद्धीच्या झोतात आणलं. महत्त्वाचं म्हणजे भाजपा खासदार सनी देओल यांच्या प्रचारासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीत दीप सिद्धू होता. लाल किल्ल्यावर झालेल्या घटनेनंतर मात्र सनी देओल यांनी ट्विट करून आपला आणि आपल्या कुटुंबाचा दीप सिद्धूशी कोणताही संबंध नसल्याचं काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले आहे, असं देओल यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- ट्रॅक्टर मोर्चा : दिल्लीच्या रस्त्यांवर हिंसा करणारे घुसखोर होते; ४० शेतकरी संघटनांचा दावा

दीप सिद्धू आंदोलनात कसा आला?

शेतकरी आंदोलन सुरू झाल्यानंतर अनेक कार्यकर्ते आणि कलाकार शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आंदोलनात सहभागी झाले. या कलाकारांमध्ये एक दीप सिद्धूही होता. दिल्ली-हरयाणा सीमेवरील शंबू येथे तो शेतकऱ्यांबरोबर धरणे देत होता.