महाराष्ट्रामधील मराठा समाजाच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी रात्री पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. त्यापाठोपाठ ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनाही भेटले. मराठा समाजाच्या मोर्चाना सामोरे जाण्याबाबत शहांबरोबर खलबते झाल्याचे समजते.

गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास दिल्लीत उतरल्यानंतर फडणवीस थेट शहांच्या निवासस्थानी गेले.  चर्चेतील मुद्दय़ांबाबत स्वत: फडणवीस काहीही बोलले नाहीत; पण सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार, मराठा समाजाच्या मोर्चाचा चर्चेमध्ये मुख्य मुद्द होता. मोच्र्यांमागचे मेंदू, त्याचे संभाव्य राजकीय परिणाम, मुंबईतील मोच्र्यामध्ये कायदा व सुव्यवस्था सांभाळणे आणि या मोच्र्यांचे अन्य घटकांमध्ये उमटलेले पडसाद यावर तपशीलवार चर्चा झाली.

मराठा मोर्चे हे संकट नसून संधी आहे. मराठा नेत्यांनी मराठा समाजाचे प्रश्न सोडविलेले नाहीत. पण भाजप सरकारने जर हे प्रश्न सोडविले तर त्यातून मोठी राजकीय संधी उपलब्ध होऊ शकते, असे शहांनी सूचित केल्याचे समजते. ‘प्रस्थापितविरुद्ध विस्थापित’ या मुद्दय़ावर जोर द्या आणि ‘विस्थापित’ असल्याची भावना बळावलेल्या गरीब सामान्य मराठा समाजाला स्वत:कडे वळवा, असेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे कळते. ‘सामना’मधील व्यंगचित्राच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडे असलेला विस्थापित मराठा समाज भाजपकडे खेचण्याबाबतही चर्चा झाल्याचे समजते.