देशातील जवळपास प्रत्येक निवडणुकीत अचूक रणनीती आखून भाजपला विजय मिळवून देणारे पक्षाचे ‘चाणक्य’ अमित शहा यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. फेसबुकवरील त्यांच्या फॉलोअर्सने १ कोटीचा आकडा ओलांडला आहे. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर सर्वाधिक फेसबुक फॉलोअर्स असणाऱ्या राजकीय नेत्याचा मान अमित शहा यांनी मिळाला आहे. भाजपच्या ट्विटर अकाऊंटवरून याबद्दल अमित शहांचे कौतूक करण्यात आले आहे. एरवीही राजकारणात मोदी-शहा ही जोडीने भल्या भल्या राजकीय नेत्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. त्यानंतर आता सोशल मीडियावरही या जोडीचा दबदबा निर्माण झाला आहे. सध्या फेसबुकवर भारतीय राजकारण्यांमध्ये नरेंद्र मोदी यांचे सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. तब्बल ४ कोटी २६ लाख जण त्यांना फॉलो करतात. त्यापाठोपाठ १ कोटी २० लाख लोक अमित शहा यांचे फॉलोअर्स आहेत. हा टप्पा गाठल्यानंतर अमित शहा यांनी ट्विट करून आपल्या फॉलोअर्सचे आभार मानले. तुम्हा सर्वांनी दाखविलेल्या स्नेह आणि सहकार्यासाठी आभार, असे शहा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. अमित शहा ट्विटरवरही खूप सक्रिय आहेत. ट्विटरवर त्यांचे तब्बल ५८ लाख ८९ हजार फॉलोअर्स आहेत. सध्या भाजपच्या ‘मिशन २०१९’ या उपक्रमातंर्गत त्यांचा १०० दिवसांचा देशव्यापी दौरा सुरू आहे. या उपक्रमातंर्गत भाजपची मतपेढी आणखी मजबूत करण्याचा चंग त्यांनी बांधला आहे.

काही दिवसांपूर्वीच गुजरातमध्ये आमदार असलेल्या शहांनी गुजरातमधूनच राज्यसभेसाठी अर्ज भरला होता. तेव्हापासून ते केंद्रात मंत्री होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. अखेर अमित शहा यांनीच या चर्चेला पूर्णविराम दिला होता. केंद्रात मंत्री होण्याची कोणतीही योजना नाही. मी जिथे आहे, तिथे आनंदी आहे. २०१९मधील लोकसभा तयारीला लागलो आहे. पक्षविस्ताराचे आव्हान आहे, असे त्यांनी निवडक माध्यमांना सांगितले होते.