निवडणुकीपूर्वी राज्याचा दर्जा देण्याची ओमर अब्दुल्लांची मागणी

जम्मू-काश्मीरमध्ये अविश्वाासाचे वातावरण असून केंद्र सरकारने ते दूर केले पाहिजे, असे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ. फारूक अब्दुल्ला यांनी दिल्लीहून परतल्यानंतर शनिवारी येथे सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरबाबत आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीला डॉ. अब्दुल्ला हजर होते. येथे आल्यानंतर त्यांनी वार्ताहरांना सांगितले की, तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी १९९६च्या निवडणुकीपूर्वी जम्मू-काश्मीरला स्वायत्तता देण्याचे आश्वाासन सभागृहात दिले होते.  ती स्वायत्तता कोठे आहे, असा सवाल डॉ. अब्दुल्ला यांनी केला. असे अविश्वाासाचे वातावरण आहे, त्यामुळे आम्ही प्रतीक्षा करू आणि केंद्र सरकार काय करते ते पाहू,  असे ते म्हणाले.

दरम्यान, निवडणुका घेण्यापूर्वी जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा द्यावा, असे मोदी यांनी बोलाविलेल्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले असल्याचे ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले.  निवडणुका घ्यावयाच्या असतील तर प्रथम राज्याचा दर्जा द्यावा असे स्पष्ट करण्यात आल्याचे ओमर  म्हणाले.  गुपकर आघाडी कमकुवत झाली असल्याच्या वृत्ताचे त्यांनी खंडन केले.