मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी करुन मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या खात्यातून पैसे काढणाऱ्या एका टोळीला आसाम पोलिसांनी उत्तर प्रदेशमधील गोरखपूर आणि बस्ती जिल्ह्यातून अटक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात पाच जणांना अटक केली आहे. आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनावल यांची खोटी स्वाक्षरी करुन सहाय्यता निधीच्या खात्यामधून पैसे काढल्याचा आरोप या पाच जणांवर ठेवण्यात आला आहे. खोटे कागदपत्र आणि सह्यांच्या मदतीने हे लोकं मुख्यमंत्री मदत निधीच्या खात्यातून पैसे काढायचे असं पोलिसांनी सांगितलं आहे. या अटकेसंदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिलं आहे.

काही दिवसांपूर्वी गुवहाटीमध्ये मुख्यमंत्री कार्यालयाच्या माध्यमातून काढण्यात येणाऱ्या मदत निधीच्या खात्यावरील व्यवहाराच्या हिशोबात गोंधळ असल्याचे दिसून आले. या प्रकरणाचा तपास विशेष पथकाकडे देण्यात आला. तसेच हे प्रकरण थेट मुख्यमंत्री मदतनिधीशी संबंधित असल्याने १५ दिवसांच्या आत याचा तपास पूर्ण करण्याचे आहेश देण्यात आले. या प्रकरणामध्ये पथकामधील पोलीस अधीक्षक रोसी कालिता यांनी १२ ऑगस्ट रोजी एफआयआर दाखल केली. खोट्या स्वाक्षऱ्या करुन हरयाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पैसे काढण्यात आल्याचा उल्लेख या एफआयआरमध्ये करण्यात आला होता.

एफआयआर दाखल झाल्यानंतर याप्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या तुकडीतील सात पोलीस कर्मचाऱ्यांनी गोरखपुर आणि बस्ती येथील काही ठिकाणी छापे मारले. यामध्ये त्यांनी पाच जणांना ताब्यात घेतले. यासंदर्भातील माहिती तपासाचे नेतृत्व करणाऱ्या पोलीस अधिक्षकांनाही दिली आहे. तपासादरम्यान अटक करण्यात आलेल्या पाचही आरोपींनी यापूर्वीही अशाप्रकारे आपण पैशांचे गैरव्यवहार केल्याची कबुली दिली आहे. यापूर्वीही या आरोपींनी खोट्या स्वाक्षऱ्या करुन खात्यांमधून पैसे काढण्याचे मान्य केलं आहे असं पोलिसांनी सांगितलं.

या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी आसाम पोलिसांच्या तुकडीला उत्तर प्रदेश पोलिसांनी सहकार्य केलं. आरोपींनी काढलेली सर्व रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. याच वर्षी जानेवारी महिन्यामध्ये जम्मू-काश्मीरमध्येही अशाच प्रकारचे प्रकरण समोर आलं होतं. माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करुन सरकारी सेवांचा लाभ घेणाऱ्या एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन वर्षांपूर्वी आरोपीने वैष्णो देवी जाण्यासाठी हेलिकॉप्टरचे तिकीट बूक करण्यासाठी मेहबुबा मुफ्तींची खोटी स्वाक्षरी केल्याचे सांगण्यात आलं होतं.