पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा सत्तेची लालसा असणारे गुंड असल्याची टीका माजी पंतप्रधान आणि दिवंगत भाजपा नेते अटलबिहारी वाजपेयी यांची पुतणी करुणा शुक्ला यांनी केली आहे. सत्ता मिळवण्यासाठी भाजपाने आपली विचारधारा बदलली अशीही टीका त्यांनी केली आहे. बाराबंकी येथे काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
सत्तेत येण्यासाठी आपल्या नेतृत्त्वात बदल करणाऱ्या पक्षावर विश्वास ठेवू शकत नाही अशी टीका करुणा शुक्ला यांनी केली आहे. 2014 मध्ये करुणा शुक्ला यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. पुढे त्यांनी म्हटलं आहे की, ‘आज भाजपाचे आदर्श पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांनी सत्ता मिळवण्यासाठी गुजरात दंगल घडवून आणली आणि माजी गृहमंत्री जे अडीच वर्ष तडीपार होते असे लोक आहेत. भाजपाचे आदर्श असणारे हे नेते गुंड असून ते देशाचं कधीच भलं करु शकत नाही’, असं करुणा शुक्ला यांनी म्हटलं आहे.
करुणा शुक्ला यांनी आपलं हे वक्तव्य निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नसून देशाप्रती असलेली चिंता आणि लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे. भाजपाने आपली विचारसरणी तसंच अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या नेत्यांसोबत तडजोड केली असंही त्यांनी म्हटलं आहे.
‘भाजपा आणि आरएसएससाठी राष्ट्रवाद हा नवा राजकीय अजेंडा आहे. मोदी आणि अमित शहा भारत माता की जय आणि वंदे मातरम घोषणा देत असतात. पण त्यांच्यासाठी भगव्याचं महत्त्व तिरंग्यापेक्षा जास्त आहे. मात्र अपयश लपवून लोकांचं लक्ष वळवणं त्यांना जमणार नाही’, असंही त्या म्हणाल्या आहेत.
32 वर्ष भाजपात घालवल्यानंतर करुणा शुक्ला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करण्याच्या दृष्टीने करुणा शुक्ला यांच्यावर पक्ष कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.