अल्पवयीन मुलींवर होत असलेल्या बलात्कारांच्या घटनांमुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. अल्पवयीन मुलींवरील लैंगिक शोषणाच्या वाढत्या प्रकारामुळे काही दिवसांपूर्वी पॉक्सो कायद्यात बदल करण्यात आला आहे. नुकताच बिहारमधील जेहानाबाद येथे एका अल्पवयीन मुलीची ६ ते ७ व्यक्तींनी छेड काढली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा याबाबत देशभरात चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, यावरून बलियाचे भाजपा आमदार सुरेंद्र सिंह यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. अल्पवयीन मुलींचे खुलेआम फिरणे योग्य नाही. त्यांनी मोबाइलही वापरू नये. त्यांच्या फिरण्याने आणि मोबाइलच्या वापरामुळे बलात्कारासारख्या घटना घडत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे.

स्मार्टफोनमुळे मुले बिघडत आहेत. मोबाइलमुळे त्यांना चुकीच्या सवयी लागत आहेत. त्याचबरोबर सध्याच्या मुली मुक्तपणे फिरत असतात. त्यामुळेच बलात्कारासारख्या घटना घडत आहेत, असे म्हणत इतक्यावरच न थांबता समाजात विविध प्रकारच्या विकृती जन्माला आल्या आहेत. या विकृतींना पालक जबाबदार आहेत. कारण अल्पवयीन मुलांचे ते योग्यपद्धतीने संरक्षण करत नाहीत, असा आरोपही केला.

वादग्रस्त वक्तव्य करण्याचा सुरेंद्र सिंह याचा इतिहास आहे. उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी भाजपा आमदार कुलदिपसिंह सेंगर यांचा बचाव करताना त्यांनी अत्यंत लाजीरवाणे वक्तवय केले होते. कोणताही व्यक्ती ३-४ व्यक्तींच्या आईवर बलात्कार करू शकत नाही. हे शक्यच नाही, असे खळबळजनक वक्तव्य त्यांनी केले होते.