केंद्रीय गृह मंत्रालयाने देशासाठी प्राण अर्पण केलेल्या शहीदांच्या कुटुंबियांसाठी एक सकारात्मक पाऊल टाकले आहे. या कुटुंबियांसाठी मंत्रालयाने ‘भारत के वीर’ या नावाने एक वेबसाइट सुरु केली असून त्याव्दारे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. वेबसाइटच्या माध्यमातून नागरिकांना दान कऱण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. त्याला सर्व स्तरातून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असून हजारो जणांनी त्यासाठी तयारी दर्शवली आहे.

नुकतेच या वेबसाइटसाठी एक गीत तयार करण्यात आले. त्याच्या उद्घाटन सोहळ्याला प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार उपस्थित होता. या कार्यक्रमादरम्याने त्यानेही नागरिकांना शहीदांच्या कुटुंबियांना मदत कऱण्याचे आवाहन केल्यावर अवघ्या एका तासाच्या आत जवळपास १३ कोटींचा निधी जमा झाला आहे.

या वेबसाइटच्या गीताचे उद्घाटन तीन मूर्ती भवनमध्ये आयोजित सोहळ्यात गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाले. या सोहळ्याला केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू, हंसराज अहिर, अभिनेता अक्षय कुमार उपस्थित होते. यावेळी बोलताना अक्षय कुमारने जास्तीत जास्त लोकांनी मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन उपस्थितांना केले आणि या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला. अवघ्या तासाभरात १२.९३ कोटी रुपये मदतनिधीमध्ये जमा झाले. आपल्या आवाहनाला लोकांनी दिलेला प्रतिसाद पाहून आपल्या ट्विटर हँडलवरुन मदत करणाऱ्या सर्वांचे कौतुक करत आभार मानले. यामध्ये अतिशय उत्तम उपक्रमाबद्दल गृहमंत्री राजनाथ सिंह यांचेही त्याने विशेष आभार मानले.