बिहार काँग्रेसमधील अंतर्गत खदखद समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव पत्कारावा लागल्यापासून, काँग्रेसच्या प्रत्येक बैठकीत गदारोळ पाहायला मिळत आहे. याचप्रमाणे आज (मंगळवार) काँग्रेसच्या किसान मोर्चाच्या बैठकीत देखील जोरदार धिंगाणा झाला. बिहार काँग्रेसचे प्रभारी भक्तचरण दास यांच्या समोरच कार्यकर्त्यांना गदारोळास सुरुवात केली. यावेळी, काँग्रेस नेते राजकुमार शर्मा यांनी अन्य काँग्रेस नेत्याच्या अंगावर रागाच्या भरात खुर्ची फेकल्याचेही घटना घडली.

बिहारची राजधानी पटणा येथे दोन दिवसांपासून बिहार काँग्रेसचे नवे प्रभारी भक्तचरण दास हे दाखल झाले असून, ते पक्ष कार्यकर्त्यांसोबत सातत्याने बैठका घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी सदाकत आश्रम येथे काँग्रेसने किसान मोर्चाची बैठक बोलावली होती. बैठकीस सुरुवात होताच त्या ठिकाणी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये आपसात बाचाबाचीला सुरूवात झाली. याचे रुपांतर वादामध्ये झाले व याप्रसंगी किसान मोर्चाचे नेते राजू सिंह यांनी अन्य नेत्यांच्या अंगावर थेट खुर्चीच फेकली.

भक्तचरण दास यांनी सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे कुणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. थोड्यावेळ ते देखील या गोंधळातच अडकले होते.