नवी दिल्ली : केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा व गुजरात या राज्यांत ‘बर्ड फ्लू’चा प्रसार झालेला असतानाच दिल्लीत जसोला पार्क येथे २४ कावळे तर संजय सरोवरात १० बदके मृतावस्थेत आढळून आली आहेत. दरम्यान दिल्लीतील गाझीपूरची कोंबडय़ांची बाजारपेठ दहा दिवस बंद करण्याचे आदेश मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जारी केले आहेत.

बदकांचे नमुने घेण्यात आले असून ते पशुसंवर्धन खात्याला देण्यात आले आहेत. कावळ्यांच्या मृत्यूंबाबत दिल्ली सरकारला माहिती देण्यात आली आहे. सध्या तरी सर्व उद्याने खुली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हौझ खास येथे अनेक पक्षी असून तेथे कुणी जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांत राजधानी दिल्लीत ३५ कावळे मरण पावले असून पशुसंवर्धन खात्याने आतापर्यंत कावळ्यांसह पन्नास पक्षी मरण पावल्याचे म्हटले आहे. मौर्य विहार, हस्तसाल या भागात काही कावळे मृत्युमुखी पडले होते असे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राकेश सिंह यांनी सांगितले.

जुनागडमध्ये ४, जम्मूत १५० कावळे मृत

गुजरातमधील जुनागड जिल्ह्य़ात मंगरोळ येथे चार कावळे मृतावस्थेत सापडले असून त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. जम्मूमध्ये राजौरी, कथुआ व उधमपूर भागात एकूण १५० कावळे मृतावस्थेत सापडले असून नमुने पंजाबमधील जालंधर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

परभणीत शेकडो कोंबडय़ा, पक्ष्यांचा मृत्यू

परभणी तालुक्यातील मुरुंबा येथे शेकडो कोंबडय़ा शुक्रवारी मृतावस्थेत आढळून आल्या. शहरातील नारायण चाळ परिसरातही दिवसभरात अज्ञात आजाराने काही पक्षी मृतावस्थेत आढळून आले आहेत. या घटनेची पशुचिकित्सक विभागाकडून नोंद घेण्यात आली असून औरंगाबाद येथून एक पथक लवकरच दाखल होऊन पाहणी करणार असल्याची माहिती प्रशासनातील सूत्रांकडून मिळाली आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी मुरुंबा येथे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गावात सर्वेक्षणाचे काम पूर्ण होईपर्यंत कुक्कुट पक्ष्यांची खरेदी, विक्री, वाहतूक, बाजार व जत्रा, प्रदर्शन तसेच पशुपक्ष्यांच्या ने-आण करण्याबाबत शुक्रवारपासून प्रतिबंध घातला आहे. दरम्यान, पशुसंवर्धन विभागाचे पथक मुरुंबा येथे लगेच दाखल झाले असून मृत्यू पावलेल्या पक्ष्यांचे नमुने त्यांनी तपासणीसाठी पुणे येथे पाठवले आहेत. ‘बर्ड फ्लू’च्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशाराही संबंधितांकडून देण्यात आला आहे.