अलिगढ मुस्लीम विद्यापीठात पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांचे छायाचित्र लावण्यावरून अलीगढचे भाजपा खासदार सतीश गौतम यांनी कुलगुरू तारिक मन्सूर यांना स्पष्टीकरण मागितले आहे. गौतम यांनी मन्सूर यांना पत्र लिहिले आहे. जिनांचा फोटो लावण्याची तुमच्यावर का वेळ आली असा सवाल त्यांनी विचारला आहे.

भारताच्या विभाजनानंतर पाकिस्तानच्या संस्थापकाचे छायाचित्र लावण्यामागे काहीच औचित्य नाही. जर त्यांना खरंच कोणाचे छायाचित्र लावायचे असेल तर त्यांनी महापुरूष महेंद्रप्रताप सिंह यांचे छायाचित्र लावले पाहिजे. त्यांनीच विद्यापीठासाठी जमीन दान दिली होती, असे गौतम यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. गौतम यांच्या पत्रावर प्रतिक्रिया देताना विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष फैजल हसन याने प्रतिक्रिया दिली आहे. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आजपर्यंत जिनांबाबत काही शिकवले गेलेले नाही आणि त्यांच्यासंबंधित कोणाताही धडा त्यात नसल्याची माहिती त्याने दिली.

विद्यापीठात जिनांचा फोटो १९३८ पासून म्हणजे भारताच्या फाळणी अगोदरपासून लावलेले आहे. संसदेकडून जर जिनांचे छायाचित्र हटवण्याबाबत काही सूचना आली तर त्याचे पालन केले जाईल असे सांगत हसनने संसदेतील जिनांचा फोटो अजून का हटवलेला नाही, असा उलट सवाल गौतम यांना विचारला आहे.

विद्यार्थी संघटनेचा विद्यमान अध्यक्ष मश्कूर अहमद उस्मानीने जिना हे अविभाजित भारताचे नायक असल्याचे म्हटले. तो म्हणाला की, १९४७ पूर्वी जिनांना आजीवन सदस्यत्व देण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे छायाचित्र अद्यापपर्यंत विद्यापीठात लावण्यात आले आहे.