लोकसभा निवडणुकीत थ्रीडी तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रचारात मुसंडी मारणाऱ्या भाजपने गुजरातमध्ये मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पारंपारिक पद्धतींचा वापर सुरु केला आहे. भाजपने ‘विकासाची जादू’ हे नवे प्रचार अभियन सुरु केले असून त्यासाठी जादूगारांची मदत घेतली जाणार आहे. ग्रामीण भागातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप जादूच्या प्रयोगांचा आधार घेणार आहे. विशेष म्हणजे यासाठी आमंत्रित करण्यात आलेले सर्व जादूगार महाराष्ट्रातील आहेत.

महाराष्ट्रातील ३६ जादूगारांच्या टीम गुजरातच्या ग्रामीण भागांमध्ये जाणार आहेत. जादूचे प्रयोग करुन त्यामधून भाजप सरकारने केलेला विकास सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम या जादूगारांकडून केले जाईल. गेल्या २२ वर्षांपासून गुजरातमध्ये भाजप सत्तेत आहे. या काळात झालेली विकासकामे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपने ‘जादूच्या प्रयोगांचा’ आधार घेतला आहे. या माध्यमातून भाजप १४४ विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचार करणार आहे. दोन टप्प्यांमध्ये हा प्रचार केला जाईल. ‘विकासाच्या जादूचा प्रयोग’ साधारणत: २५ ते ३० मिनिटांचा असणार आहे.

‘विकासाच्या जादू’चे काही प्रयोग अहमदाबादमधील भाजपच्या कार्यालयात दाखवण्यात आले. यावेळी अमरावतीहून आलेल्या सय्यद इरफान नावाच्या जादूगाराने एका पांढऱ्या रुमालाचे रुपांतर भाजपच्या बॅनरमध्ये करुन दाखवले. ‘ग्रामीण भागातील जनतेपर्यंत त्यांच्याच शब्दांमध्ये पोहोचण्यासाठी जादूचा आधार घेतला जात आहे. या माध्यमातून मतदारांना भाजपच्या कार्यकाळात झालेला विकास दाखवला जाईल. यासोबतच जादूच्या प्रयोगांमुळे त्यांचे मनोरंजनही होईल. काँग्रेसला गुजरातचा विकास करता आला नाही. मात्र भाजप सरकारने विविध योजनांची यशस्वी अंमलबजावणी करुन राज्याचा विकास केला. तोच दाखवण्याचा प्रयत्न या प्रचार अभियानातून केला जाईल,’ अशी माहिती भाजपच्या प्रचार प्रचार विभागाचे सदस्य असलेल्या दक्षेश शहा यांनी दिली.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी जादूगार आहेत, असे मी ऐकले आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी त्यांच्याच राज्यात जादूचे प्रयोग करण्याची इच्छा होती. त्यामुळे मी परशोत्तम रुपाला यांच्याशी संपर्क साधला. त्यातूनच हा प्रचार अभियानाची संकल्पना पुढे आली,’ असे जादूगार इरफानने सांगितले.

काही दिवसांपूर्वीच राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींची तुलना जादूगाराशी केली होती. राहुल गांधी उत्तर गुजरातच्या दौऱ्यावर असताना त्यांच्यासमोर एक जादूगार जादूचे प्रयोग करत होता. यावरुन राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला होता. ‘तुम्हाला (जादूगाराला) जादूचे खेळ दाखवताना पाहून मला मोदीजींची आठवण येते. मोदींनीदेखील २२ वर्षे गुजरातमध्ये जादू केली. मात्र तुम्ही जादू करुन पैसे काढून दाखवले. मात्र मोदींनी ते पैसे गायब करुन दाखवले, इतकाच फरक आहे,’ असे गांधींनी म्हटले होते.