|| हृषीकेश देशपांडे

म्हैसूर शहरातील चामुंडेश्वरी हा मतदारसंघ मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांच्या उमेदवारीने चर्चेत आला आहे. या मतदारसंघात त्यांना धर्मनिरपेक्ष जनता दलाचे विद्यमान आमदार व त्यांचे एकेकाळचे समाजवादी विचारधारेतील मित्र जी. टी. देवेगौडांचे कडवे आव्हान आहे. या मतदारसंघाबरोबरच सिद्धरामैय्या हे बागलकोटमधील बदामी मतदारसंघातूनही निवडणूक लढवत आहेत. तिथे त्यांचा सामना भाजपच्या श्रीरामलूंशी आहे.

चामुंडेश्वरी मतदारसंघाशेजारील वरूणा मतदारसंघातून सिद्धरामैय्या गेल्या वेळी विजयी झाले होते. मात्र, यावेळी वरुणामधून त्यांचे पुत्र डॉ. यतेंद्र उभे आहेत. त्यामुळे सिद्धरामैय्यांना मतदारसंघ बदलावा लागला. २००६ मध्ये सिध्दरामैय्या निसटत्या मताधिक्याने चामुंडेश्वरीतून विजयी झाले होते. या मतदारसंघात भाजपचा उमेदवार नवखा आहे. त्यामुळे भाजपने सिद्धरामैय्या यांच्याविरोधात जनता दलाशी छुपी हातमिळवणी केल्याची चर्चा होती.

चामुंडेश्वरीत सिद्धरामैय्या यांच्या कुरबा तसेच देवेगौडा यांच्या वोक्कलिंग समाजाचे मतदार मोठय़ा प्रमाणात येथे आहेत. म्हैसूर शहरातील पहिल्या उड्डाणपुलाचे काम सध्या याच मतदारसंघात सुरु आहे. शहरात आयुक्तालयाची निर्मिती हीदेखील सिद्धरामैय्या यांच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. दोन आठवडय़ांपूर्वी मतदारसंघात रस्ते चांगले करण्यात आले आहेत. अर्ज भरल्यानंतर सिद्धरामैय्या यांनी दोन वेळा मतदारसंघाचा दौरा केल्याचे सांगण्यात आले. प्रसिद्ध अशी म्हैसूर औद्योगिक वसाहतही याच भागात येते. मतदारसंघात फारसा विकास झालेला नाही, असे अनेकांचे म्हणणे आहे. भाजपचा उमेदवार तडजोडीचा (डमी) आहे अशी माहिती त्याने दिली. अण्णय्या या नागरिकाने या भागातील खराब रस्ते व अपुऱ्या सुविधांबाबत तक्रार केली. मात्र उमेदवार मुख्यमंत्री असल्याने त्या प्रतिमेच्या जोरावर सिद्धरामैय्या विजयी होतील असे भाकित त्याने वर्तवले. औद्योगिक वसाहतीत कचराकुंडय़ा भरून वाहतात अशी तक्रार शिवण्णा यांनी केली. त्यांनीही मुख्यमंत्रीच लढतीत असल्याने चित्र वेगळे असल्याचे सांगितले. तर औद्योगिक वसाहतीतमधील एका सुरक्षारक्षकाने देवेगौडांनाच संधी असल्याचे सांगितले.

नेत्यांच्या पुत्रांमधील लढत टळली

वरूणा मतदारसंघात सिद्धरामैय्यांचे पुत्र डॉ. यतिंद्र यांच्याविरोधात भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बी.एस.येडियुरप्पा यांचे पुत्र बी.वाय. विजयेंद्र निवडणूक लढविणार होते. त्यासाठीचा प्रचारही त्यांनी सुरु केला होता. मात्र, पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे वादही झाला. विजयेंद्र यांच्या समर्थकांनी गदारोळ केला. मात्र विजयेंद्र यांना रिंगणात न उतरविण्याची अनेक कारणे सांगितली जात आहेत. काहींच्या मते भाजपला सिद्धरामैय्या यांच्या घराणेशाहीवर टीका करता यावी म्हणून हा निर्णय घेतला. याबाबत पक्षाकडून थेट काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही. पंतप्रधानांनी कर्नाटकच्या प्रचारसभांमध्ये टीका करत दोन अधिक एक(सिद्धरामैय्यांच्या दोन तर यतिंद्र यांची एक जागा) असा उल्लेख केला. विजयेंद्र यांना उमेदवारी नाकारल्याने ‘ वरुणा’त आजी-माजी मुख्यमंत्री पुत्रांमधील लढत टळली हे नक्की.

जुना म्हैसूर निर्णायक

राज्यातील राजकारणाच्या दृष्टीने निर्णायक असा हा विभाग आहे. बंगळुरु शहरातील २८ जागा वगळता उर्वरित दहा जिल्ह्य़ांत ५० च्या आसपास जागा जुना म्हैसूर विभागात (राज्यात एकूण विधानसभेच्या जागा २२४) आहेत. प्रामुख्याने काँग्रेस व जनता दल यांच्यात या विभागात सामना आहे. म्हैसूर हे काँग्रेसचे प्रभावक्षेत्र मानले जाते.