व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांना अनिश्चित काळासाठी सुट्टीवर जाण्याचा कोणताही आदेश देण्यात आलेला नसल्याचं आयसीआयसीआय बँकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. बँकेने यासंबंधी स्टेटमेंट जारी केलं आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की, ‘आयसीआयसीआय बँक बोर्डाने चंदा कोचर यांना कोणत्याही सुट्टीवर पाठवलं नसून वृत्त फेटाळत आहोत. त्या आपल्या वार्षिक सुट्टीवर असून ती आधीच नियोजित होती. तसंच त्यांचा उत्तराधिकारी शोधण्यासाठी सर्च कमिटी गठीत केल्याचंही वृत्त बोर्ड फेटाळत आहे’.

गुरुवारी चंदा कोचर यांना बोर्डाने सुट्टीवर जाण्यासाठी सांगितल्याचं वृत्त समोर आलं होतं. यानंतर बँकेकडून हे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. दरम्यान बुधवारी बँकेने व्हिडीओकॉन समूहाला दिलेल्या विस्तारित कर्ज प्रकरणी चंदा कोचर यांच्यावरील आरोपांची स्वतंत्रपणे चौकशी केली जाईल, असे जाहीर केले असून चौकशी समितीचे अध्यक्ष कोण असतील, याचा निर्णय ऑडिट कमिटी घेणार आहे.

व्हिडीओकॉन समूह तसेच नूपॉवर कंपनीला २०१२ मध्ये बँकेने ३, २५० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले. चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर हे नूपॉवरचे अध्यक्ष आहेत. या कंपनीत व्हिडीओकॉन समूहाची ६४ कोटी रुपयांची गुंतणूक आहे. पतीशी संबंधित कंपनीला कर्ज वितरणात प्राधान्य दिल्याचा आरोप चंदा कोचर यांच्यावर होत आहे. या प्रकरणात सीबीआयचा तपास सुरु असून सेबीने नुकतीच नोटीस बजावली होती.

आयसीआयसीआय बँकेने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार चंदा कोचर यांची चौकशी केली जाणार आहे. अज्ञात ‘व्हिसल ब्लोअर’ने केलेल्या आरोपांची स्वतंत्र चौकशी केली जाईल. चौकशी समितीचे अध्यक्ष, समितीचे अधिकार आणि चौकशीचा कालावधी याबाबतचे सर्व निर्णय ऑडिट कमिटी घेईल, असे बँकेने स्पष्ट केले. चौकशीत आवश्यकता वाटल्यास फॉरेन्सिक मदत तसेच ईमेल देखील तपासले जातील आणि संबंधित व्यक्तींचा जबाब देखील घेतला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.