लठ्ठपणाची समस्या सध्या भलतीच फोफावू लागली आहे. पूर्वी सुखवस्तू कुटुंबाचे लठ्ठपणा हे लक्षण मानले जायचे, मात्र सध्याच्या जगात लठ्ठपणा कुणालाही नको आहे. लठ्ठपणामुळे मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब आदी आजारांना निमंत्रण मिळते. सध्या तर बालक आणि तरुणांमध्ये ही समस्या अधिक पसरू लागली आहे. बदलती जीवनशैली आणि फास्ट फूडचे सेवन त्याला कारणीभूत आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी तरुणाई अनेक उपाययोजना करते, मात्र त्याला यश येत नाही. ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी तर लठ्ठपणा कमी करण्यासाठी जालीम उपाय शोधून काढला आहे. तिखट मिरची किंवा मिरचीयुक्त पदार्थाचे सेवन केल्यास लठ्ठपणा कमी करता येऊ शकतो, असा दावा या शास्त्रज्ञांनी केला आहे.
अॅडलेड विद्यापीठाच्या ‘आहार आणि पोटाचे विकार’ विभागातील साहाय्यक प्राध्यापक असलेल्या अमांदा पेज यांच्या नेतृत्वाखाली पथकाने हा निष्कर्ष काढला आहे. त्यांनी तिखट मिरचीची पूड, त्याचे पोटातील टीआरपीव्ही-१ नावाने ओळखले जाणारे संवेदक (रिसेप्टर्स) आणि पोट भरल्याची जाणीव यांचा कार्यकारणभाव तपासला. आपले पोट जेव्हा भरलेले असते तेव्हा ते फुगते आणि तेथील चेतातंतूंना उद्दीपित करते. त्यावरून आपल्या शरीराला पुरेसे अन्नग्रहण केल्याचे समजते आणि आपण आणखी खाण्याचे थांबवतो. या क्रियेत तिखट मिरचीची संवेदना देणाऱ्या पोटातील टीआरपीव्ही-१ या रिसेप्टर्सचीही भूमिका असल्याचे संशोधकांनी शोधून काढले. जर हे संवेदक काढून टाकले किंवा क्रियाशून्य झाले तर पोट भरल्याची भावना होत नाही किंवा मंदावते. मिरचीतील कॅप्सैसीन नावाच्या द्रव्यामुळे हे संवेदक जागे होऊन भूक भागल्याची भावना होते, तर अत्याधिक चरबीयुक्त आहार घेतल्याने हे संवेदक निकामी होऊन पोट भरल्याची भावना होण्याची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे तिखट खाल्ल्यास पोट लवकर भरल्याची भावना होऊन लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते, असा निष्कर्ष या संशोधकांनी काढला आहे.