केदारनाथ मंदिराचे द्वार बंद होण्याआधीच तिथे बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे केदारनाथ मंदिरात दर्शनाठी पोहचलेले उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर अडकून पडण्याची वेळ आली आहे. केदारनाथचे द्वार बंद होताच ८.३० वाजताच दोन्ही मुख्यमंत्र्यांना हेलिकॉप्टरने ब्रदिनाथ गाठायचं होतं. मात्र बर्फवृष्टी झाल्याने हेलिकॉप्टरचं उड्डाण शक्य नव्हत. त्यामुळे बर्फवृष्टी थांबण्याची वाट पाहण्याखेरीज काहीही मार्ग या दोघांपुढे उरला नाही.

 

केदारनाथ मंदिर आणि परिसरावर बर्फाची दुलई पसरल्याचंच चित्र आहे. या भागात थंडीचा कडाकाही वाढला आहे. गंगोत्री धाम मध्येही मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी झाली आहे. गंगोत्री धामचे द्वार बंद होताच वातावरणात बदल झाला आणि बर्फवृष्टी सुरु झाली. भारतातील पर्वतरांगा असलेल्या भागात थंडीचा कडाका वाढल्याचं दिसून येतं आहे. जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान या राज्यांमध्ये झालेल्या पावसामुळे हवा जास्त थंड झाली आहे. उंचसखल भागात राहणाऱ्या स्थानिकांच्या अडचणींमध्ये बर्फवृष्टीमुळे भर पडली आहे. येत्या काही दिवसांमध्ये तापमान आणखी कमी होऊ शकते असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.