नासाच्या ग्रहशोधन उपग्रहाने तीन नवीन बाह्य़ग्रहांचा शोध लावला असून ते ग्रह पृथ्वीपासून ७३ प्रकाशवर्षे दूर आहेत, असे वैज्ञानिकांनी सांगितले.

याबाबतचा शोधनिबंध हा ‘नेचर अ‍ॅस्ट्रॉनॉमी’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला असून यात तीन नवीन बाह्य़ग्रहांपैकी एक हा खडकाळ व पृथ्वीपेक्षा काहीसा मोठा आहे, तर इतर दोन ग्रहांवर वायू जास्त असून ते पृथ्वीपेक्षा दुप्पट आकाराचे आहेत. ‘टेस ऑब्जेक्ट ऑफ इंटरेस्ट’ म्हणजे ‘टीओआय २७०’ या तारका प्रणाली भोवती हे ग्रह फिरत असून ‘ट्रान्झिटिंग एक्सोप्लॅनेट सव्‍‌र्हे सॅटेलाइट’ या उपग्रहाने ज्या प्रकारचे ग्रह शोधणे अपेक्षित होते त्याच प्रकारचे ते ग्रह आहेत, असे रिव्हरसाइड येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे. यातील लहान ग्रह हा मातृ ताऱ्यापासून अशा अंतरावर आहे की, तेथे पाणी द्रवरूपात असू शकेल. टीओआय २७० हा मातृतारा शांत आहे. त्यावर कुठल्या ज्वाळा नाहीत त्यामुळे तो व त्याभोवती फिरणारे ग्रह यांचे निरीक्षण करणे सोपे आहे. यात काही ग्रह हे ताऱ्यापासून वसाहतयोग्य अंतरावर आहेत. म्हणजे ते इतक्या अंतरावर आहेत ज्यामुळे तेथे पाणी असू शकते.

आपल्या सौर मालेत पृथ्वी, मंगळ, शुक्र व बुध असे लहान ग्रह आहेत. ते खडकाळ आहेत तर शनी, गुरू, युरेनस, नेपच्यून हे  ग्रह वायूने भरलेले आहेत. नेपच्यूनच्या निम्म्या आकाराचे ग्रह आपल्या ग्रहमालेत फारसे नाहीत पण ते इतर ताऱ्यांभोवती आहेत. टीओआय २७० हा ग्रहमालेच्या अभ्यासातून पृथ्वीसारखे खडकाळ ग्रह व नेपच्यूनसारखे वायूचे ग्रह यांच्यातील दुवा सांधता येणे शक्य आहे, असे एमआयटीचे संशोधक मॅक्सिमिलीयन गुंथर यांनी म्हटले आहे.  याची पाठपुरावा निरीक्षणे २०२१ मध्ये जेम्स वेब अवकाश दुर्बीणीच्या मदतीने घेतली जाणार आहेत.

टीओआय २७० ग्रहांवर पाण्याचे सागर होते की नाही ते तपासले जाईल. ही ग्रहमाला खूप लांब म्हणजे ७३ प्रकाशवर्षे दूर आहे. आपल्या आकाशगंगेचा व्यास हा एक लाख प्रकाशवर्षे आहे.