पठाणकोट : अमेरिकी बनावटीची आठ अ‍ॅपाची स्टील्थ हेलिकॉप्टर्स भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात मंगळवारी दाखल करण्यात आली. सीमावर्ती भागातील दहशतवादासह सुरक्षेची अनेक आव्हाने सामोरी येत असताना भारतीय हवाई दलाची मारक क्षमता त्यामुळे वाढली आहे. बोईंग कंपनीने तयार केलेली ही हेलिकॉप्टर्स विकत घेण्याचा करार चार वर्षांपूर्वी करण्यात आला होता. त्यात अ‍ॅपाची एएच ६४ ई प्रकारची २२  हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याचे ठरले होते.

हवाई दल प्रमुख धनोआ यांनी यावेळी सांगितले की, ‘अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या या हेलिकॉप्टर्सचा मोठा फायदा अपेक्षित आहे. तसेच भारतीय हवाई दलाच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने टाकण्यात आलेले हे पाऊल आहे. या हेलिकॉप्टर्समुळे हवाई दलाची क्षमता वाढणार असून ही हेलिकॉप्टर्स भारताच्या पश्चिम सीमेवर तैनात केली जाणार आहेत.’  भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी छावण्यांवर हवाई हल्ले केले होते त्यानंतर सहा महिन्यांनी ही हेलिकॉप्टर्स हवाई दलात सामील करण्यात आल्याने आता भारताची मारक क्षमता वाढली आहे. एएच ६४ ई अ‍ॅपाची हेलिकॉप्टर्स ही जगातील सर्वात आधुनिक हेलिकॉप्टर्स मानली जातात ती सध्या अमेरिकी लष्करातही वापरली जात आहेत. भारतीय हवाई दलाच्या भविष्यकालीन गरजांची पूर्तता या हेलिकॉप्टर्समुळे होणार आहे. टेहळणी, सुरक्षा, शांतता मोहिमा, सर्व प्रकारच्या स्थितीत हल्ले अशा सर्वच बाबीत त्यांची कामगिरी चांगली आहे. बोईंग कंपनीने म्हटले आहे की, ही हेलिकॉप्टर्स खरेदी करणारा भारत हा सोळावा देश असून अधिक प्रगत अशी हेलिकॉप्टर्स भारताला देण्यात आली आहेत. ‘भारतीय हवाई दलासाठी अ‍ॅपाची हेलिकॉप्टर्स ही महत्त्वाची ठरतील तसेच भारतीय लष्करी दलांच्या आधुनिकीकरणाच्या गरजांची पूर्तता करण्यात मोठी भूमिका पार पाडण्याची बोईंग कंपनीची तयारी आहे,’ असे  बोईग इंडियाचे अध्यक्ष सलील गुप्ते यांनी सांगितले.