26 February 2021

News Flash

मतदान यंत्रातील फेरफार सिद्ध करा, निवडणूक आयोग देणार ‘ओपन चॅलेंज’

ओपन चॅलेंजमध्ये सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना बोलवले जाईल.

केंद्रीय निवडणूक आयोग

मतदान यंत्रात फेरफार होत असल्याचा आरोप विविध राजकीय पक्षांकडून केला जात असतानाच आता निवडणूक आयोगानेही या आरोपांना चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. निवडणूक आयोगाने मतदान यंत्रासंदर्भात आरोप करणाऱ्यांना खुले आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच याची तारीख जाहीर करु अशी माहिती निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिली आहे.

राजकीय पक्षांकडून होणाऱ्या आरोपांवर आता निवडणूक आयोग उत्तर देणार आहे. निवडणूक आयोग आता आरोप करणाऱ्यांना खुले आव्हान देणार आहे. मतदान यंत्रात कसे फेरफार करता येतात हे सिद्ध करा असे आव्हानच निवडणूक आयोग देणार आहे. यासाठी लवकरच एक तारिख ठरवली जाईल. यापूर्वी २००९ मध्येदेखील निवडणूक आयोगाने अशा स्वरुपाचे खुले आव्हान दिले होते. त्यावेळीही ईव्हीएममध्ये फेरफार शक्य असल्याचे आरोप झाले होते. पण ‘ओपन चॅलेंज’मध्ये एकालाही हे आरोप सिद्ध करता आले नव्हते. आता पुन्हा एकदा ईव्हीएमवर आरोप होत असल्याने पुन्हा ओपन चॅलेंज देण्याचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती सूत्रांनी दिली. ओपन चॅलेंजमध्ये सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना बोलवले जाईल. याशिवाय तंत्रज्ञान क्षेत्रातील मंडळी, संस्था आणि मतदान यंत्रावर शंका उपस्थित करणाऱ्यांना या ओपन चॅलेंजमध्ये सहभाग घेता येणार आहे.

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत गेल्या काही दिवसांपासून आरोप सुरु आहेत. या मतदान यंत्रात कोणतेही बटण दाबले की मत भाजपलाच जाते असा आरोप आम आदमी पक्ष, बसपाने केला आहे. तर काँग्रेसनेही यावरुन सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यातील अतेर व उमरिया जिल्ह्यातील बांधवगड या विधानसभा मतदारसंघांत येत्या ९ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी मतदान यंत्राची चाचणी शुक्रवारी अतेर येथे घेण्यात आली होती. या चाचणीत, संबंधित यंत्रावर दिलेल्या विविध पक्षांच्या पर्यायातील कुठलेही बटण दाबले तरी त्यातून भारतीय जनता पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेल्या कमळाचीच पावती मिळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. यामुळे या आरोपांना आणखी धार मिळाली आहे.

सोमवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाने आम्हाला ७२ तासांसाठी मतदान यंत्र द्यावे असे आव्हान दिले होते. ‘आम्ही या कालावधीत मतदान यंत्रात बदल करता येतात हे सिद्ध करुन दाखवू’ असे केजरीवाल यांनी म्हटले होते. महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांमध्येही मतदान यंत्रात फेरफार झाल्याचा आरोप झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2017 8:53 am

Web Title: election commission of india to throw an open challenge to test the infallibility of evms
Next Stories
1 आता आरबीआय आणणार २०० रूपयांची नवी नोट ?
2 मेक इन इंडियातील ब्राबो रोबोटला युरोपात विक्रीस परवानगी
3 सोमालियाच्या चाच्यांकडून ११ भारतीयांचे अपहरण
Just Now!
X