दिल्लीचे माजी विधिमंत्री जितेंद्रसिंह तोमर यांना बनावट पदवीप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर दिल्लीतील काँग्रेस कार्यकर्ते आप सरकारविरुद्ध अधिक आक्रमक झाले असून त्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
दिल्ली काँग्रेसचे प्रमुख अजय माकन आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. सी. चाको यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी दिल्ली सचिवालयावर मोर्चा नेला आणि केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दिल्लीचे मुख्यमंत्री सत्तेच्या लालसेत बुडाले असल्याचा आरोप या वेळी माकन यांनी केला. ज्याच्याकडे बनावट पदवी आहे तोच सरकारी वकिलांची नियुक्ती करतो, या बाबत माकन यांनी आश्चर्य व्यक्त केले. ही संपूर्ण प्रक्रियाच बेकायदेशीर असून त्याला केजरीवाल हेच जबाबदार आहेत, असेही माकन म्हणाले. दिल्लीचे माजी विधिमंत्री जितेंद्रसिंह तोमर यांनी आरएमएल अवध विद्यापीठातून पदवीधर झाल्याचे जाहीर केले असले तरी विद्यापीठाने अशा प्रकारची कोणतीही नोंद दफ्तरी नसल्याचे स्पष्ट केल्याने तोमर यांच्यापुढील अडचणी वाढणार आहेत.
दरम्यान, आपल्याकडील पदवी खरी आहे, बनावटीचे कारस्थान भाजप आणि केंद्र सरकारने रचल्याचा आरोप जितेंद्रसिंह तोमर यांनी केला आहे.तोमर यांच्या बनावट पदवीप्रकरणी चौकशी अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले होते.

इराणी, कथेरियांचे काय?
खोटय़ा प्रमाणपत्रावरून दिल्लीचे कायदा मंत्री तोमर यांच्यावर केंद्र सरकारने ज्या धडाडीने कारवाई केली, त्याच धडाडीने त्यांनी असाच गुन्हा करणारे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि रामशंकर कथेरिया यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी करून काँग्रेसने भाजपची कोंडी केली. इराणी यांनी प्रतिज्ञापत्रात शैक्षणिक पात्रतेबद्दल चुकीची माहिती दिली होती तर कथेरिया हे गुणपत्रिकेतील खाडाखोडीच्या प्रकरणात अडकले आहेत. ‘आप’चे नेते आशुतोष यांनीही इराणींवर कारवाईची मागणी केली आहे.

केजरीवाल-नजीब जंग यांची भेट
दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांच्याशी सुरू असलेला संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुढाकार घेतला असल्याचे संकेत मिळत आहेत. केजरीवाल यांनी बुधवारी जंग यांची भेट घेतली. एकमेकांमध्ये उत्तम समन्वय कसा राहील यासंदर्भात या वेळी चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा कारभार यावरून आप सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून पराकोटीचा संघर्ष सुरू आहे.दिल्ली जल मंडळाचे उपाध्यक्ष कपिल मिश्रा यांचा मंत्रिमंडळात विधीमंत्री म्हणून समावेश करणार असल्याची माहिती केजरीवाल यांनी जंग यांना दिली. या वेळी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हेही उपस्थित होते. नायब राज्यपाल आणि आप सरकारमध्ये उत्तम समन्वय असावा यासह विविध विषयांवर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. चर्चा उत्तम झाली आणि केजरीवाल यांना निरोप देण्यासाठी जंग स्वत: कार्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत आले होते, असे सूत्रांनी सांगितले.