इराणमध्ये डिसेंबर २०१३ पासून अडकून पडलेले येथील अभियंता संकेत पंडय़ा व हरयानाचे अभियंता महंमद हुसेन खान यांची सुखरूप सुटका करून त्यांना परत मायदेशी आणावे,अशी विनंती संकेत यांच्या मातोश्री इलाबेन पंडय़ा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इमेलद्वारे केली आहे.
इराकमध्ये काम करणाऱ्या दोन अभियंत्यांचे पासपोर्ट नियोक्तयाचे कंपनीशी भांडण झाल्यानंतर हिसकावून घेण्यात आले आहेत. संकेत व महंमद हे इराणमध्ये झाजन शहरात गोव्याच्या पॉवर इंजिनियरिंग इंडिया कंपनीसाठी काम करीत होते, पण व्यावसायिक भांडणातून नियोक्तयाने त्यांचे पासपोर्ट जप्त केले. ऊर्जा प्रकल्पाच्या देखरेखीसाठी हे दोन अभियंते भारतातून इराणला गेले होते. ‘वझरजहा’ कंपनीच्या वतीने हा प्रकल्प राबवला जात होता.  
मुलगा व खान यांना नैराश्य आले असून त्यांची प्रकृती बिघडली आहे. भारतीय दूतावासाने त्यांना तेहरानमधील हॉटेलमध्ये हलवले आहे. आपले पती दिनेश पंडय़ांचा गेल्यावर्षी मृत्यू झाला असून संकेत हा कुटुंबातील एकमेव कमावता आहे, त्याला पत्नी व दोन मुले आहेत. आमचे कुटुंब वडोदरा येथे असून पंतप्रधान मोदी यांना आम्ही लोकसभेसाठी मत दिले आहे. आता त्यांनी या दोघा अभियंत्यांची सुटका करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी इलाबेन यांनी केली आहे.