तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी ‘भारत बंद’द्वारे केलेल्या शक्तिप्रदर्शनाची दखल घेत केंद्र सरकारने बुधवारी संघटनांना प्रस्ताव पाठवला. मात्र, तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम राहिलेल्या शेतकऱ्यांनी हा प्रस्ताव फेटाळून १४ डिसेंबरला देशव्यापी आंदोलनाची हाक दिली. त्यानंतर कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांनी प्रस्ताव फेटाळल्याने तिढा सोडविण्याच्या दिशेने केंद्राने बुधावारी आणखी एक पाऊल पुढे टाकले. कृषी कायद्यांतील सर्व आक्षेपांच्या मुद्दय़ांवर खुलेपणाने चर्चेस सरकार तयार आहे, असे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी स्पष्ट केलं. मात्र, शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र करत आता रेल्वे मार्ग रोखण्याचा इशारा दिला आहे. याच संघर्षामध्ये या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या आणि विरोध करणाऱ्यांमध्ये सोशल नेटवर्किंगवरही चांगलीच वादळी चर्चा होताना दिसत आहे. आंदोलनाचे समर्थक आणि विरोधक एकमेकांवर टीका करतानाच समोरची बाजू कशी चूक आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशीच एक टीका प्रसिद्ध ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी ट्विटवरुन केली आहे.

बुधवारी शेतकऱ्यांनी सरकारचा प्रस्ताव फेटाळून लावल्यानंतर प्रशांत भूषण यांनी एक फोटो शेअर करत, “शेतकऱ्यांनाही मोदी आणि शाह यांच्यासारखी मध्यस्थ (मिडल मॅन) नकोयत,” असा टोला लगावला आहे. प्रशांत यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये “शेतकरी थेट अंबानी-अदानींशी बोलतील. त्यांना मिडल मॅनची गरज नाही,” असा मजकूर लिहीला आहे.

भाजपाच्या अनेक समर्थकांकडून नवीन कृषी कायदे म्हणजे शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये असणाऱ्या व्यक्तींची साखळी तोडली जाईल आणि थेट माल ग्राहकांपर्यंत पोहचून शेतकरी आणि ग्राहकांनाही फायदा होईल असं सांगितलं जात आहे. यासंदर्भातील पोस्ट शेअरताना नो मोअर मिडल मॅन असं वारंवार वापरलं जात आहे. अप्रत्यक्षपणे शेतमालाचा भाव वाढणाऱ्या व्यापारांचं महत्व या कृषी कायदामुळे कमी होऊऩ याचा सर्वांना फायदा होईल असं सांगितलं जात आहे. याचवरुन आता नो मोअर मिडल मॅनचा वापर करत भाजपाविरोधकांनी मोदी आणि शाह हे शेतकरी आणि बड्या उद्योजकांमधील व्यापाऱ्यांसारखी मधील माणसं असल्याचा प्रचार सोशल नेटवर्किंगवर सुरु केला आहे.