गेल्या दोन आठवड्यापासून थायलंडमधील सर्वात मोठ्या गुहेत लहान मुलांची फुटबॉल टीम अडकली आहे. या मुलांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. या मोहीमेत सहभागी असलेल्या थायलंडच्या एका माजी नेव्ही सिल कमांडोचा मृत्यू झाला आहे. गुहेमध्ये ऑक्सिजनची कमतरता असल्यानं या कमांडोचा गुदमरून मृत्यू झाल्याचं समजत आहे. चियांग राय प्रांतातील थांम लुआंग नांग नोन गुहेत अडकलेल्या या फुटबॉल टीमला बाहेर काढण्याचा प्रयत्न गेल्या आठवडाभरापासून सुरू आहे.

बेपत्ता झाल्यापासून नऊ दिवसांनी त्यांना शोधण्यात यश आलं आहे. चारहून अधिक देश आणि या देशांतील १ हजारांहून अधिक कमांडो, तज्ज्ञ या बचाव मोहीमेत सहभागी झाले आहेत. ११ ते १६ वयोगटातील ही मुलं २३ जूनपासून बेपत्ता असल्याचं समजत आहे. या मुलांचा शोध घेण्यास यश आलं असलं तरी त्यांना गुहेतून बाहेर काढणं मात्र सध्या अशक्य आहे. मुलांना गुहेबाहेर काढण्याचे दोनच पर्याय बचाव पथकाकडे आहेत. गुहेत साचलेल्या पाण्यातून पोहून ही लहान मुलं गुहेतून बाहेर येऊ शकतात. मात्र यातल्या एकाही मुलाला पोहता येत नसल्यानं त्यांच्या प्रशिक्षणाला सुरूवात झाली आहे. मात्र यात मोठी जोखीम आहे.

गुहा वरून खोदून त्यानंतर या मुलांना बाहेर काढता येऊ शकते मात्र यासाठीही निसर्गाचं मोठं आव्हान बचावपथकाकडे असणार आहे. सध्या थाय नौदलातील आघाडीचे पाणबुडे या मुलांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. या मुलांना गुहेत ऑक्सिजन सिलेंडर पुरवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. हे सिलेंडर पोहोचवत असताना एका माजी थाय सिल कमांडोचा मृत्यू झाला आहे. रात्री उशीरा कमांडोचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्याचा मृत्यू झाल्याचं सिलच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे. ही घटना नक्कीच दुर्दैवी आहे पण तरीही बचाव पथकाचं काम सुरू राहिल आणि या मुलांना लवकरात लवकर बाहेर काढण्यात येईल अशी माहिती थाय सिल कमांडोनं दिली आहे.

या गुहेत पाणी साचलं असल्यानं पोहून मुलांपर्यंत पोहचण्यासाठी तज्ज्ञ पाणबुण्यांनादेखील पाच तासांचा अवधी लागत आहे. त्यामुळे या मुलांना बाहेर काढण्याचं मोठ आव्हानं सगळ्यांपुढे आहे. त्याचप्रमाणे येत्या काही दिवसांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यानं गुहेतील पाण्याची पातळी वाढू शकते. त्यामुळे संभाव्य धोके लक्षात घेऊन युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. गुहेत अडकलेल्या १२ मुलांसोबत २५ वर्षांचा शिकाऊ फुटबॉल प्रशिक्षकदेखील आहे.