सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेन्डरी एज्युकेशन (सीबीएसई) CBSE काल (रविवारी) देशभरात नीट परीक्षेचे आयोजन केले होते. देशभरात नीट परीक्षा Neet Exam सुरळीतपणे पार पडली असताना राजस्थानमधील दहशतवादविरोधी पथकाने नीट परीक्षेचा पेपर फोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका टोळीला अटक केली. १५ दिवसांपासून टोळीवर नजर ठेवल्यानंतर संबंधितांना अटक केल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. हिंदुस्तान टाईम्स या वृत्तपत्राने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

‘अटक करण्यात आलेल्या आरोपींना पैसे देणाऱ्या ११ परीक्षार्थींची चौकशी करण्यात आली आहे. अटकेत असलेली टोळी नीटची प्रश्नपत्रिका विकत होती. मात्र या टोळीकडून विकण्यात आलेली प्रश्नपत्रिका आणि प्रत्यक्षातील प्रश्नपत्रिका वेगळी आहे,’ अशी माहिती दहशतवादविरोधी पथकातील पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. नीट परीक्षार्थींकडून प्रत्येकी ५ लाख रुपये स्वीकारुन आरोपींनी त्यांना प्रश्नपत्रिका पुरवली होती.

‘अटक करण्यात आलेल्या आरोपींनी परीक्षार्थींकडून पैसे घेत त्यांना नीटचे पेपर पुरवण्याचे आश्वासन दिले होते. या प्रकरणाच्या तपासासाठी आमचे एक पथक दिल्लीला, तर दुसरे पथक जयपूरला रवाना झाले होते. या दोन्ही पथकांनी संशयितांवर करडी नजर ठेवली होती,’ अशी माहिती दहशतवादविरोधी पोलीस पथकाचे अधीक्षक विकास कुमार यांनी दिली. ‘याप्रकरणी विक्रम सिंह, भूपेंद्र शर्मा, अशोक गुप्ता आणि राहुल यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यातील विक्रम सिंग आणि राहुल हे बिहारचे असून अशोक गुप्ता हा दिल्लीचा रहिवासी आहे. तर शर्मा हा जयपूरमधील शासकीय कर्मचारी आहे,’ असे विकास कुमार यांनी सांगितले.

‘आम्ही चारही आरोपींना फसवणूक प्रकरणी अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असून त्यानंतर आणखी काही मुद्दे तपासातून पुढे येतील,’ असेही कुमार यांनी म्हटले. सध्या पेपर फुटी प्रकरणी दोन राज्यांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.