गेल्या अनेक वर्षांपासून मी दिल्ली क्रिकेट संघटनेतील कथित भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवतो आहे. माझा लढा भ्रष्टाचाराविरुद्ध असून, जेटलीविरूद्ध नसल्याचे भाजपतून निलंबित करण्यात आलेले खासदार कीर्ती आझाद यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले. पक्षविरोधी कारवाया केल्याचा भाजपने त्यांच्यावर ठेवलेला आरोपही त्यांनी स्पष्टपणे फेटाळला. डीडीसीएतील गैरव्यवहाराची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
गेल्याच आठवड्यात संसदेचे हिवाळी अधिवेशन संस्थगित झाल्यावर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी कीर्ती आझाद यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर कीर्ती आझाद यांनी आपल्यावरील कारवाई अयोग्य असल्याचे म्हटले आहे.
ते म्हणाले, भाजप किंवा केंद्र सरकारविरोधात मी कोणतेही आरोप केलेले नाहीत. मी केवळ क्रिकेटमधील भ्रष्टाचाराबद्दल बोलतो आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मी क्रिकेटमधील भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवतो आहे. यापुढेही मी माझा लढा सुरूच ठेवणार. यामुळे अरूण जेटली यांना त्यात ओढून आणण्याचे काहीच कारण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
दिल्ली क्रिकेट संघटनेतील कथित भ्रष्टाचाराविरूद्धचे पुरावे मी डीडीसीएच्या प्रमुखांकडे दिले होते. मात्र, त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.