अमेरिकेच्या हेरगिरीचा चेहरा जगासमोर मांडून खळबळ उडवून देणाऱ्या एडवर्ड स्नोडेन याने आपण कनिष्ठ दर्जाचा हॅकर नसून अमेरिकेनेच आपणास एखाद्या गुप्तेहेराला दिले जाणारे उत्तम प्रशिक्षण दिल्याचा दावा केला आहे.
अमेरिकेतील एनबीसी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने अमेरिकेने केलेले आरोप फेटाळले आहे. स्नोडेन याने स्पष्ट केले की, त्याला एखाद्या गुप्तहेराप्रमाणे उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यात आले होते. तसेच उच्च दर्जाच्या सरकारी यांत्रिक मदतही देऊ केली होती. कामाच्या वेळी ओळखही गुप्त ठेवली जात होती, असेही त्याने सांगितले.
आपण एक तज्ज्ञ असून अमेरिकेसाठी अतिशय वरिष्ठ पातळीवर काम करीत होतो. याशिवाय संरक्षण गुप्तचर संस्थेत शिक्षक म्हणूनही काम केले आहे. शिवाय सीआयए आणि राष्ट्रीय सुरक्षा संस्थेसाठी गुप्तचर म्हणूनही काम केल्याचा दावा स्नोडेन याने या मुलाखतीदरम्यान केला. मात्र असे असले तरी आपण तंत्रज्ञ असल्याचेही त्याने सांगितले. गेल्या वर्षी अमेरिकेच्या हेरगिरीचा बुरखा फाडल्यानंतर स्नोडेन याने अमेरिका सोडली. त्यानंतर अमेरिकेने तो केवळ एनएसएमध्ये कंत्राटी कामगार असल्याचे जाहीर केले होते. मात्र स्नोडेन याने अमेरिकेनेच आपल्याला प्रगत प्रशिक्षण दिल्याचे सांगत सीआयएसाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केल्याचा दावा केला आहे. दरम्यान, २०१० मध्ये स्नोडेन हा भारतात आला होता. सहा दिवसांच्या भारत वास्तव्यात त्याने संगणकातील सॉफ्टवेअर हॅक करण्याबरोबरच संगणकाची यंत्रणा तोडण्याचे आधुनिक प्रशिक्षण घेतल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.