पंजाब नॅशनल बँकेला ११ हजार ४०० कोटींचा चुना लावून देशाबाहेर पळालेल्या नीरव मोदीला भारतात कसे आणले जाईल हा प्रश्न देशाला पडला आहे. अशात आता नीरव मोदीचा मामा आणि त्याचा सहकारी मेहुल चोक्सी याने त्याच्या वकिलामार्फत एक पत्र पाठवले आहे. मला या प्रकरणात नाहक गोवण्यात आले. मी नियतीने जे समोर वाढून ठेवले आहे त्याला सामोरा जायला तयार आहे. मी काहीही चुकीचे वागलेलो नाही. पीएनबी बँकेच्या कर्ज प्रकरणात मला नाहक गोवण्यात आले आहे. मात्र मी समोर आलेल्या परिस्थितीला तोंड द्यायला तयार आहे.

काही दिवसातच लोकांसमोर सत्य येईलच असे मेहुल चोक्सीने त्याच्या वकिलामार्फत गीतांजली ज्वेलर्स शॉपमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक पत्र लिहिले आहे ज्यात त्याने त्याची बाजू मांडली आहे. ‘एएनआय’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

माझ्या कंपनीत काम करणाऱ्या ३५०० कर्मचाऱ्यांचे थकलेले पैसे मी देऊ शकत नाही. तपास यंत्रणांनी माझ्या मालमत्ता आणि बँक खाती गोठवली आहेत. त्यामुळे मला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. तपास यंत्रणा आणि केंद्र सरकारने या सगळ्या प्रकरणात गोंधळ निर्माण केला आहे. माझ्याविरोधात भीती निर्माण करणारा आणि अन्याय करणारा माणूस अशी प्रतिमा निर्माण करण्यात आली आहे, असेही मेहुल चोक्सी याने आपल्या पत्रात म्हटले आहे. तसेच कर्मचाऱ्यांनी काळजी करु नये.

माझ्याबाबत तपास यंत्रणांचा काहीतरी गैरसमज झाला आहे. चौकशीचा आणि तपासयंत्रणांचा ससेमिरा दूर झाला की मी स्वतः तुमची देणी देईन असेही चोक्सीने त्याच्या पत्रात म्हटले आहे. ईडीने मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांच्याशी संबंधित १४४ दुकानांवर छापे मारले. इतक्या मोठ्या प्रमाणावर छापेमारी झाल्याने मी आर्थिक अडचणीत आहे असेही चोक्सी याने म्हटले आहे. याआधी नीरव मोदीने पत्र लिहून कर्ज फेडणे शक्य नसल्याचे म्हटले होते. त्यापाठोपाठ आता मेहुल चोक्सीनेही पत्र लिहून आपली बाजू मांडली आहे.