भारताला डिवचणाऱ्या देशांना भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी शनिवारी कडक इशारा दिला. देशाच्या स्वाभिमानासाठी गरज पडल्यास आम्ही सीमापार जाऊन युद्ध करु शकतो, असं त्यांनी म्हटलं आहे. ऋषीकेश येथे गंगेच्या काठी असलेल्या परमार्थ निकेतन आश्रमाला भेट दिल्यानंतर डोवाल यांच्या हस्ते गंगा पूजन झालं, यावेळी ते बोलत होते.

डोवाल म्हणाले, “इतिहास साक्षी आहे की भारताने कधीही कोणावर हल्ला केला नाही. मात्र, देशाच्या स्वाभिमानासाठी गरज पडल्यास सीमाचं नव्हे तर सीमापार जाऊनही आम्ही युद्ध करु शकतो. नवा भारत वेगळ्या विचारांचा आहे. स्वार्थासाठी आम्ही कोणाला डिवचणार नाही मात्र, स्वाभिमानाच्या रक्षणासाठी कोणाला सोडणारही नाही.”

“आपण जगातील मोठ-मोठ्या संस्कृतींचे पतन झालेले पाहिले आहे. तसेच नव्या संस्कृतींना विकसित होतानाही पाहिले आहे. मात्र, भारतीय संस्कृती संपूर्ण जगात वेगळी आहे. शेकडो वर्षांपासून परदेशी आक्रमणं आणि गुलामी सोसल्यानंतरही कोणतीही बाहेरची संस्कृती या देशावर प्रभाव टाकू शकली नाही,” अशा शब्दांत त्यांनी भारतीय संस्कृतीचा गौरव केला.

“याचं सर्वात मोठं कारण म्हणजे आपली आध्यात्मिक ताकद आहे. एक जवान भलेही सीमेवर भौतिक स्वरुपात सीमेचं रक्षण करीत असेल, मात्र देशात लाखो-करोडो लोक प्रत्यक्षात आपली संस्कृती आणि श्रद्धेसह राष्ट्राला जोडण्याचे काम करीत असतात. भारतात मोठ्या प्रमाणावर परदेशी नागरिक केवळ हेच पाहण्यासाठी येतात की भारतीयांमध्ये अशी कोणती शक्ती आहे जी एका सशक्त राष्ट्राची निर्मिती करते,” असंही यावेळी डोवाल म्हणाले.

तरुणांना आवाहन करताना ते म्हणाले, “प्रत्येक तरुण देशाचा सैनिक आहे. याच भावनेने आम्हाला एका सशक्त भारताची निर्मिती करायची आहे.”