लोकांच्या तीव्र विरोध प्रदर्शनानंतर ‘कराची बेकरी’च्या मालकाला दुकानाच्या नाम फलकावरील ‘कराची’ शब्द कपडयाने झाकावे लागले आहेत. कर्नाटकच्या बंगळुरु शहरात ही कराची बेकरी असून शुक्रवारी संध्याकाळी लोकांनी या दुकानावरील कराची नावाविरोधात जोरदार प्रदर्शन केले. पाकिस्तानने पुलवामा येथे केलेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाल्यानंतर सर्वसामान्यांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे. लोक स्वयंफुर्तीने रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत.

बेकरीच्या कर्मचाऱ्यांनी दुकानाच्या नाम फलकावरील कराची हे शब्द झाकून टाकले आहेत. बेकरीच्या कर्मचाऱ्यांनी फोन केल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजारो दिला. बेकरीच्या मालमत्तेचे कुठलेही नुकसान झालेले नाही. कराची हे पाकिस्तानातील शहर आहे. पुलवामा हल्ल्यानंतर देशातल्या वेगवेगळया भागात शिक्षण घेणाऱ्या काश्मिरी विद्यार्थ्यांना आणि व्यापाऱ्यांना धमक्या देण्याचे प्रकार समोर आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपली लढाई काश्मीरसाठी आहे. काश्मिरी जनतेविरोधात नाही हे स्पष्ट केले आहे. जिबरान नाझीर या काश्मिरी पत्रकाराला पुण्यात मारहाण झाल्याची घटना घडली आहे. एकूणच पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तान विरोधात संतापाची भावना असून त्याचे वेगवेगळया पद्धतीने पडसाद उमटत आहेत.