भारतीय सैन्याचे जगभरात कौतुक होत असल्याचे आपण अनेकदा ऐकतो. मात्र हे आता जगभरात अधिकृतपणे निश्चित झाले आहे. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्सने २०१७ मध्ये केलेल्या सर्वेक्षणावरुन नुकतीच एक जागतिक यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार १३३ देशांमध्ये भारताचा जागतिक स्तरावर चौथा क्रमांक लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भारतीय सैन्यासाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे.
यामध्ये पहिल्या क्रमांकावर महासत्ता असलेला अमेरिका आहे, तर रशिया दुसऱ्या आणि चीन तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे या अहवालातून समोर आले आहे. विशेष म्हणजे भारताचा शत्रू आणि शेजारी असलेल्या पाकिस्तानचा या यादीत १३ वा क्रमांक आहे. मागच्याच वर्षी पाकिस्तानने या यादीत पहिल्या १५ मध्ये प्रवेश केल्यानंतर आपले स्थान कायम राखण्यात त्यांना यश आले आहे. फ्रान्स, यूके, जपान, तुर्की आणि जर्मनी हे देशही पहिल्या दहामध्ये स्थान टिकवून आहेत. या सर्वेक्षणासाठी सैन्याशी निगडित विविध ५० निकषांचा अभ्यास करण्यात आला होता. यात भौगोलिक स्थिती, लष्कराकडे असणारे स्त्रोत, सैनिकांचे प्रशिक्षण, तंत्रज्ञान, सैनिकांची संख्या यांचा आढावा घेण्यात आला.
जीएफपीच्या सर्वेक्षणानुसार भारताकडे ४२,७,२४० सशस्त्र सैनिक असून त्यातील १३,६२,५०० इतके सक्रीय आहेत. तर चीनकडे ३७,१२,५०० सशस्त्र सैनिक असून त्यातील २२,६०,००० सैन्य सक्रिय आहे. अर्थसंकल्पामध्ये भारताच्या तुलनेत चीनची संरक्षण क्षेत्रासाठीची तरतूद तीनपट जास्त आहे. मात्र पाकिस्तानशी तुलना करता भारत जवळपास सर्वच आघाडयांवर सरस असल्याचे चित्र या सर्वेक्षणातून समोर येत आहे.