भारत आता आपल्या आयटी क्षेत्रातील वैशिष्ट्याचा अधिक विस्तार करीत असून तंत्रज्ञानाच्या विकासावर भर देण्यात येत आहे. तसेच या तंत्रज्ञानाच्या गुणवत्तेवरही लक्ष दिले जात आहे. त्यामुळे तंत्रज्ञानात आता आम्ही इतके सक्षम झाले आहोत की, जगही आमची मदत मागत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिल्लीत आयोजित भारत-इटली टेक्नॉलॉजी समिटमध्ये केले.


मोदी म्हणाले, भारताचा स्पेस प्रोग्राम इतका उत्कृष्ट आहे की, याची य़शस्वीता इटलीने देखील अनुभवली आहे. आज भारत इटलीसहित जगातील अनेक देशांचे उपग्रह खूपच कमी खर्चात अंतराळात प्रक्षेपित करीत आहे. दरम्यान, भारत आणि इटलीच्या प्रतिनिधींना संबोधित करताना मोदी म्हणाले, भारताने तंत्रज्ञानाला सामाजिक न्याय, सशक्तिकरण, सर्व समावेशकता, सरकारी क्षेत्र आणि पारदर्शकतेचे माध्यम बनवले आहे.

भारतात जन्म दाखल्यापासून निवृत्तीनंतर पेन्शनपर्यंतच्या अनेक सुविधा आज तंत्रज्ञानाच्या मदतीने ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर ३०० पेक्षा अधिक केंद्र आणि राज्य सरकारच्या सेवांना उमंग या अॅपच्या माध्यमातून एकाच प्लॅटफॉर्मवर आणण्यात आले आहे. देशातील ३ लाखांपेक्षा अधिक कॉमन सर्विस सेंटर्सद्वारे गावागावांत ऑनलाइन सेवा देण्यात येत आहे.

मोदी म्हणाले, भारतात डिजीटल पेमेंटची वाढ वेगाने होत असून याचा वेग महिन्याला २५० कोटी व्यवहार असा आहे. भारतात गेल्या ४ वर्षांत १ जीबी डेटाची किंमत ९० टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे. त्यानुसार आमचे ध्येय आहे की, संशोधन आणि विकास कार्यक्रम हे केवळ संशोधन केंद्रांपर्यंत मर्यादित स्वरुपात न राहता लोकांपर्यंत पोहोचायला हवेत. म्हणूनच मी सांगतो की विज्ञान हे वैश्विक असले तरी तंत्रज्ञान हे स्थानिक असायला हवे.

इटलीचे पंतप्रधान ज्युसेपे कॉन्टे यांचे एक दिवसीय भारत दौऱ्यावर मंगळवारी नवी दिल्लीत आगमन झाले. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. कॉन्टे हे भारत-इटली टेक्नॉलॉजी समिटमध्ये भाग घेण्यासाठी आपल्या उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळासोबत भारतात आले आहेत. दरम्यान, त्यांनी पंतप्रधान मोदींसह व्यापार, शिक्षण, अरोस्पेस, आरोग्य आणि गुंतवणूक अशा महत्वाच्या क्षेत्रात सहकार्य वाढीबाबत चर्चा केली.