भारतात उगम पावलेल्या योगविज्ञानाची गाथा ‘आंतरराष्ट्रीय योगदिना’निमित्ताने रविवारी जगभरामध्ये उलगडली आणि सर्वच खंडांमधील नागरिक आसनमग्न झाले.   देशभरातही सर्वच राज्ये सकाळपासून योगमय झाली. योगाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेकडो शाळकरी मुलांसमवेत आणि हजारो साधकांच्या साक्षीने राजपथावर योगसाधना केली. मोदी यांनी राजपथावर वज्रासन व पद्मासने करून स्वतच्या शिस्तबद्ध जीवनशैलीचा परिचय दिला. सुमारे दोन तास चाललेल्या योग अभ्यासात २१ योगमुद्रांचा सराव करण्यात आला. राजपथावरील या भव्य योग सोहळ्याचे दोन विक्रम गिनेस बुकमध्ये नोंदविण्यात आले आहेत.
ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, अमेरिका या प्रमुख राष्ट्रांसमवेत आशिया, आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्रांमध्ये उत्स्फूर्तपणे योगदिवस साजरा करण्यात आला.
भारताकडून  १५२ परदेशी दूतांना बोलावण्यात आले होते. जगभरात १९१ देशांतील २५१ शहरात योग दिन साजरा करण्यात आला.

मुंबईसह राज्यभरात योगोत्सव
गुरुवार रात्रीपासून संततधार असलेल्या पावसामुळे मुंबई शहरात जागतिक योग दिनाचा फज्जा होईल असे चित्र असतानाही अवघी मुंबापुरी योगमय झाली होती. मरिन ड्राइव्हपासून ते उपनगरांमधील सोसायटय़ांमध्ये योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने बर्फावरील योगासनांसारखे योगाचे विविध प्रकारही पाहायला मिळाले. तसेच राज्यभरात विविध भागांत योगादिनानिमित्त कार्यक्रम साजरे करण्यात आले.

दोन विक्रमांची गिनेस बुकात नोंद
न्यूयॉर्क : भारतात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने राजधानी दिल्लीत दोन विक्रमांची गिनेस बुकात नोंद झाली. पहिला विक्रम राजपथावरील  योगसाधनेत एकाचवेळी ३५९८५ लोकांनी सहभाग घेतला त्याचा.  एकाचवेळी एका ठिकाणी एवढय़ा लोकांनी योगसाधना कधीच केलेली नाही. राजपथावरील योगोत्सवात एकूण ८४ देशांचे नागरिक सहभागी झाले, हा दुसरा विक्रम नोंदला गेला. गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सचे उपाध्यक्ष मॅक्रो फ्रिगाटी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या न्यूयॉर्क येथील मुख्यालयात ही घोषणा केली.

योगदिनानिमित्ताने आपण कुठला दिवस साजरा करीत नाही तर मनाला प्रशिक्षण देत आहोत, शांतता व सुसंवादाचे नवे पर्व यामुळे सुरू झाले आहे. प्रगतीसाठी प्रत्येकाने योगाचा वापर करायला हवा. मात्र त्याचा व्यावसायिक हेतूने उपयोग केला जाऊ नये.     – नरेंद्र मोदी</strong>