पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ‘लॉर्ड ऑफ द रेकॉर्ड्स’ या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आधारित पुस्तकाच्या डिजीटल अवृत्तीचे अनावरण केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज ७० वा वाढदिवस असून त्यानिमित्ताने या डिजीटल अवृत्तीचे प्रकाशन करण्यात आलं आहे. दिल्लीतील भाजपाच्या मुख्यालयामध्ये हा कार्यक्रम पार पडला. मोदींनी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर २०१४ ते २०१९ दरम्यान केलेल्या विक्रमांची या पुस्तकामध्ये नोंद आहे. या पुस्तकात एकूण २४३ विक्रमांची नोंद असून ते जागतिक स्तरावरील अथवा पहिल्यांदाच एखाद्या पंतप्रधानाने नोंदवलेले विक्रम आहेत. हे छापील पुस्तक मागील वर्षीपासूनच बाजारात उपलब्ध होते. आता हे डिजीटल माध्यमांवर उपलब्ध झाले आहे.

काय आहे या पुस्तकामध्ये?

‘लॉर्ड ऑफ रेकॉर्ड्स’ हे पुस्तक डॉ. हरीश चंद्र बर्णवाल यांनी लिहिलं आहे. या पुस्तकाच्या नावाचा अर्थ होतो विक्रमांचा देवता. या पुस्तकासंदर्भातील माहिती देताना ‘अॅमेझॉन डॉट कॉम’वर हे पुस्तकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या कार्यकाळातील लेखाजोखा असल्याचे म्हटले आहे. यामध्ये मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर २०१४ ते २०१९ दरम्यान नव्या भारताने काय काय ध्येय साध्य केली यासंदर्भातील माहिती आहे. यामधील प्रत्येक विक्रम एक भारतीय म्हणून तुम्हाला अभिमान वाटणारा आहे. लेखक डॉ. बर्णवाल यांनी पंतप्रधानांच्या पहिल्या कार्यकाळातील अनेक गोष्टींचा खूप जवळून अभ्यास केला आहे.

‘लॉर्ड ऑफ द रेकॉर्ड्स’ या पुस्तकामध्ये २६ मे २०१४ ते ३० मे २०१९ च्या कार्यकाळामध्ये घडलेल्या २४३ विक्रमांची नोंद आहे. हे विक्रम जागतिक स्तरावरील तसेच पहिल्यांदाच एखाद्या भारतीय पंतप्रधानाच्या नावावर नोंदवण्यात आलेले विक्रम आहेत. जेव्हा केव्हा स्वातंत्र्यानंतरच्या भारताची चर्चा होईल तेव्हा तो कालखंड मोदींआधी आणि मोदींनंतर अशा दोन भागांमध्ये अभ्यासला जाईल असं या पुस्तकासंदर्भातील माहितीमध्ये म्हटलं आहे. भारताच्या विकासाला पंतप्रधान मोदींनी अधिक वेगवान केलं असून ती बहुआयामी केली त्याचप्रमाणे विकासाला एक नवी दिशा आणि दृष्टी मिळवून दिल्याचा दावा लेखकाने केला आहे. प्रसारमाध्यमांनी सर्वाधिक टीका केलेले पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींची ओळख असल्याचेही या पुस्तकात म्हटलं आहे. विरोधी पक्षांबरोबरच बुद्धीजीवी व्यक्तींच्या गटाने अनेकदा मोदींसंदर्भात प्रश्न उपस्थित केले. मात्र मोदींनी मेहनत आणि जनतेच्या न्यायालयामध्ये स्वत:ला सिद्ध केलं असंही लेखकाने म्हटलं आहे. अनेक अर्थांनी हे पुस्तक महत्वाचे असून भारताबद्दल जाणून घेणाऱ्यांसाठी हे पुस्तक उत्तम ठरेल असंही या पुस्तकासंदर्भातील माहितीमध्ये म्हटलं आहे.