जम्मू-काश्मीरच्या पुलवामात पुन्हा एकदा सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. दहशतवाद्यांनी जवानांच्या ताफ्यावर आयईडी स्फोट घडवून आणला तसेच गोळीबारही केला. या हल्ल्यात एक जवान जखमी झाला आहे. सतर्क झालेल्या पोलिसांनी या भागात शोध मोहिम राबवली. यावेळी त्यांना पुलवामातील गंगू भागात आणखी एक आयईडी बॉम्ब आढळून आला. हा बॉम्ब निष्क्रिय करण्यात आला असून पुढील तपास अद्याप सुरु आहे.

प्राथमिक माहितीनुसार, पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर दहशतवाद्यांनी रविवारी सकाळी ७.४०च्या दरम्यान हल्ला केला. दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या गस्ती पथकाला आयईडी स्फोटाच्या माध्यामातून निशाणा बनवले, तसेच गोळीबारही केला. जवानांचे वाहन उडवून देण्यासाठी रस्त्याच्या कडेला आयईडी पेरण्यात आले होते. या स्फोटात सीआरपीएफच्या १८२ बटालियनचा एक जवान जखमी झाला आहे. तसेच शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा रक्षकांना आणखी एक आयईडी सापडला असून तो निष्क्रिय करण्यात आला आहे.

हल्ल्यानंतर सैन्यदल आणि सुरक्षा रक्षकांनी या भागात वेढा दिला आहे. दहशतवाद्यांना शोधण्यासाठी खास मोहिम राबवण्यात आली आहे. हल्ला झालेल्या जागेवर पोलीस अधिकारी पोहोचले असून या घटेचा तपास करीत आहेत.

सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत या महिन्यांत ४८ पेक्षा अधिक दहशतवादी ठार झाले आहेत. तर सन २०२०मध्ये आत्तापर्यंत सुरक्षारक्षकांनी १३० पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.