जम्मू काश्मीर येथील नागरोटा येथे दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्रातील संभाजी यशवंत कदम हे शहीद झाले. नागरोटा येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना संभाजी कदम हे शहीद झाले. ३५ वर्षीय संभाजी कदम हे नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील जानापुरी गावचे रहिवासी आहेत. मराठा लाईफ इन्फंट्रीमध्ये संभाजी कदम कार्यरत होते.

संभाजी कदम यांना वीरमरण आल्याच्या वृत्ताला नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. संभाजी कदम यांच्या मागे आई, वडील, पत्नी व तीन वर्षांची मुलगी आहे. संभाजी यांना दोन बहिणी असून त्या दोन्हीही विवाहित आहेत. २००६ साली त्यांचा विवाह झाला. संभाजी कदम यांच्या वीरमरणाची वृत्त गावात येताच सगळीकडे शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव मंगळवारी रात्री उशिरा किंवा बुधवारी सकाळी नांदेड विमानतळावर येण्याची शक्यता असल्याचे कळते.

संभाजी यांचे आठवीपर्यंतचे शिक्षण जानापुरी येथे जिल्हा परिषद शाळेत झाले. दहावीपर्यंतचे शिक्षण वडेपुरी येथे तर महाविद्यालयीन शिक्षण सोनखेड येथे झाले. २००१ साली औरंगाबाद येथे झालेल्या सैन्यभरतीत संभाजी यांची निवड करण्यात आली होती. संभाजी यांचा विवाह सखुबाई उर्फ शीतलसमवेत २००६ साली झाला. मागील दोन वर्षांपासून संभाजी हे पुणे येथे कर्तव्यावर होते. २५ ऑक्टोबर रोजीच तातडीच्या आदेशाने त्यांना जम्मू काश्मीर येथील सांबा सेक्टर येथे रुजू करण्यात आले. तेव्हापासून ते सांबा सेक्टर येथे सीमेवर कर्तव्यावर होते. पुणे येथे कर्तव्यावर असताना त्यांनी आपले संपूर्ण कुटुंब पुणे येथेच हलवले होते. जानापुरी येथे त्यांची दोन एकर जमीन आहे.

जम्मूपासून २० किमी अंतरावर असलेल्या नागरोटा येथे लष्कराच्या १६ व्या कोअरचे मुख्यालय आहे. लष्करासाठी हा अत्यंत संवेदनशील भाग असून या भागाला दहशतवाद्यांनी लक्ष केले होते. लष्कराच्या छावणीवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक मेजर आणखी एक जवान शहीद झाले. मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला होता. दहशतवाद्यांनी आता ग्रेनेड फेकले व नंतर अंदाधुंद गोळीबार केला. हल्ल्यात आणखी जवानही जखमी झाल्याचे वृत्त आहे. या हल्ल्याला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले असून त्यात ४ अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.

दरम्यान, उरीतील दहशतवादी हल्ल्याला भारताने सर्जिकल स्ट्राइक करुन प्रत्युत्तर दिल्यापासून वारंवार पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. दरम्यानच्या काळात अनेकदा दहशतवाद्यांकडून घुसखोरीचे प्रयत्न केले गेले आहेत. दहशतवाद्यांच्या घुसखोरीवेळी पाकिस्तानी सैन्याकडून भारतीय जवानांच्या दिशेने जोरदार गोळीबार केला जातो आहे. दहशतवाद्यांची घुसखोरी यशस्वी व्हावी, यासाठी पाकिस्तानी सैन्याकडून हरतऱ्हेचे प्रयत्न केले जात आहेत. आतापर्यंत पाकिस्तानने तब्बल २५० हून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.