जम्मू-काश्मीरमधील राजकीय प्रक्रियेला गती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिल्लीत बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीला हजर राहण्याचा निर्णय गुपकर आघाडीने घेतला आहे. मात्र सर्वपक्षीय बैठकीपूर्वी भाजपा खासदार जामयांग तसेरिंग नामग्याल आणि काही सामाजिक-धार्मिक संघटनांनी केंद्रशासित प्रदेश लडाखसाठी स्वतंत्र विधानसभेची मागणी केली आहे. लडाखमधील रहिवाशांच्या जमिनीची मालकी, नोकरीचे आरक्षण, पर्यावरण व सांस्कृतिक संरक्षणासाठी भारतीय राज्यघटनेद्वारा स्वतंत्र व्यवस्थेची मागणी केली आहे.

बुधवारी, लडाखच्या विविध राजकीय-सामाजिक आणि धार्मिक संघटनांची एकत्रित मंच असलेल्या ‘पीपल्स मूव्हमेंट ऑफ लडाख’ या अ‍ॅपेक्स समितीने एका आवाजात लडाखमध्ये विधानसभा स्थापन करण्याची आणि राज्यात सहाव्या अनुसूचीच्या अंमलबजावणीच्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे. या समितीत भाजपा आणि कॉंग्रेसमधील स्थानिक नेत्यांचादेखील समावेश आहे.

पंतप्रधान मोदींसमवेत काश्मिरी नेत्यांची आज बैठक, ८ पक्षांचे नेते असतील हजर

लडाखचे माजी खासदार थुपस्तान त्सेवांग आणि खासदार जामयांग तसेरिंग नामग्याल यांनी बुधवारी लेह येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दोनदा भेटलो आहोत. आम्ही त्यांना लडाखमध्ये विधानसभेची स्थापना करण्यास आणि राज्याला घटनेच्या सहाव्या अनुसूची अंतर्गत सामिल करण्याची विनंती केली आहे. लडाखमधील नागरिकांच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक हितसंबंधांसाठी तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी हे अत्यंत महत्वाचे आहे. आमची ही मागणी आजपर्यंत पूर्ण झालेली नाही असे त्यांनी सांगितले.

“पंतप्रधानांनी काश्मीरमधील नेत्यांना बोलण्यासाठी बोलावले आहे. गुरुवारी होणाऱ्या या बैठकीत जम्मू-काश्मीरच्या संदर्भात मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. म्हणूनच आमची इच्छा आहे लडाखचे प्रलंबित प्रश्नही लवकरच सोडवण्यात यावेत. आम्ही येथे जमीन, रोजगार, पर्यावरण संरक्षण, सांस्कृतिक संरक्षण आणि इतर गोष्टींबद्दल बोलत आहोत,” असं जमयांग नामग्याल म्हणाले.

पंतप्रधानांच्या बैठकीला जाण्याचा गुपकर नेत्यांचा निर्णय

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील राजकीय प्रक्रियेला गती देण्यासाठी मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीला जम्मू-काश्मीरमधील १४ नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करून जम्मू-काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केल्यानंतर अशा प्रकारची बैठक प्रथमच होत आहे.आघाडीची भूमिका काय असेल, असे विचारले असता डॉ. अब्दुल्ला म्हणाले की, आमची भूमिका सर्वाना माहिती आहे, त्यामुळे ती परत सांगण्याची गरज नाही. जी भूमिका होती, तीच आहे आणि यापुढेही तीच राहील, असेही ते म्हणाले.