अण्णा हजारे यांनी उभारलेल्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेसाठी आलेल्या निधीचा वापर आम आदमी पक्षाने राजकारणासाठी करून घेतला, असा आरोप अण्णांनी मंगळवारी एका ध्वनिचित्रफितीद्वारे केल्यानंतर काँग्रेस व भाजपने आम आदमी पक्षावर जोरदार टीकास्त्र सुरू केले आहे. भ्रष्टाचाराविरोधात बोलणारे केजरीवाल स्वत:च कसे भ्रष्टाचारात अडकले आहेत, अशी टीका या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केली.

अरविंद केजरीवाल यांच्यावर यापूर्वी मी असाच भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. आता अण्णांनी ही ध्वनिचित्रफीत प्रकाशित करून माझ्या आरोपांना ठोस पुरावाच दिला आहे. आता भ्रष्टाचारविरोधात रण पेटवणारे केजरीवाल आणि त्यांचे सहकारी शांत का आहेत?
– दिग्विजय सिंह, काँग्रेसचे सरचिटणीस

आम्हाला या ध्वनिचित्रफितीबाबत काहीही माहीत नाही. मात्र आम आदमी पक्षामुळे अण्णा हजारे आनंदी नाहीत, हे खरे आहे. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाच्या निधीचा आम आदमी पक्षाने गैरवापर केला. अण्णांच्या या आरोपामुळे हा पक्ष नक्की काय आहे, हे उघड झाले आहे.
– प्रकाश जावडेकर, भाजपचे प्रवक्ते

अण्णांनी केलेल्या आरोपांमुळे खूप वेदना झाल्या. काँग्रेस आणि भाजप हे पक्ष अण्णा आणि आमच्यात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही लोक अण्णांना चुकीची माहिती देत असल्याचे दु:ख वाटते. मी निधीचा गैरवापर केलेला नाही
अरविंद केजरीवाल, आम आदमी पक्षाचे समन्वयक