तालिबान्यांनी केलेल्या दहशतवाद्यांनी हल्ल्यानंतर जवळपास तीन आठवडय़ांपासून बंद ठेवण्यात आलेल्या खैबर-पख्तुन्वा प्रांतातील सर्व शाळा कडेकोट सुरक्षा व्यवस्थेसह येत्या सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तीन आठवडय़ांपूर्वी तालिबान्यांनी लष्कराच्या शाळेवर दहशतवादी हल्ला चढवून १५० जणांची प्रामुख्याने विद्यार्थ्यांची निर्घृण हत्या केली होती.
शाळांच्या सुरक्षेसाठी सरकारने सुनियोजित आणि व्यापक सुरक्षा व्यवस्था आखली असल्याचे प्रांतीय माहितीमंत्री मुस्ताक घनी यांनी सांगितले. लष्कराच्या शाळेवर हल्ला चढविण्यात आल्यानंतर सरकारने सर्व शाळा बंद ठेवण्याचा आदेश दिला होता. या प्रांतातील शाळांच्या सुरक्षेला धोका असल्याचे कारण देऊन सरकारने हिवाळ्याच्या सुटीत वाढ केली होती.
स्थानिक निवृत्त कर्मचाऱ्यांची सरकारी शाळांमध्ये रक्षक म्हणून नियुक्ती करणे, ज्या पालकांची मुले शाळेत आहेत त्या पालकांनी नागरी सुरक्षा दलाप्रमाणे काम करणे आदी बाबी सुरक्षा व्यवस्थेत प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
शाळा सुरू असताना कोणत्याही अज्ञात व्यक्तीला शाळेच्या आवारात प्रवेश दिला जाणार नाही. सर्व खासगी शाळांमध्ये किमान दोन सुरक्षारक्षक ठेवण्याची त्याचप्रमाणे शाळेची बस आणि व्हॅनमध्ये प्रत्येकी एक सुरक्षारक्षक तैनात करण्याची गरज आहे.

.. तर शाळा सुरू होणार नाहीत
शाळांच्या संकुलाभोवती असलेल्या कुंपणाची उंची १२ फुटांपर्यंत वाढवून त्यावर वीजप्रवाह सुरू असलेले जाळे आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे योजनेत प्रस्तावित करण्यात आले आहे. शाळेतील प्रत्येक रक्षकाला सरकार शस्त्रे उपलब्ध करून देणार आहे. ज्या खासगी शाळांमध्ये अपुरी सुरक्षा व्यवस्था आहे त्या शाळा सोमवारपासून सुरू होणार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.