भाजप आणि रा. स्व. संघ यांच्यातील समन्वयासाठी संघाने सुरेश सोनी यांच्याऐवजी संघटनेचे संयुक्त सरचिटणीस कृष्ण गोपाळ यांची नियुक्ती केली आहे. सोनी यांचे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांशी विशेष सख्य नसल्याची चर्चा होती.लोकसभेच्या निवडणुकीत उत्तर प्रदेश, बिहारसारख्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये कृष्ण गोपाळ यांनी भाजपशी उत्तम समन्वय ठेवला होता. त्यामुळे संघाच्या ज्येष्ठ नेत्यांनी सोनी यांच्याऐवजी गोपाळ यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला.भाजपशी संबंधित सर्व प्रकरणे हाताळण्यासाठी यापुढे कृष्ण गोपाळ हे संघाचे प्रतिनिधी असतील, असे संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य यांनी सांगितले.
भविष्यातील रणनीती ठरविण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची तीन दिवसांची बैठक येथे १७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.येथील निरालानगरातील सरस्वती कुंजमध्ये ही बैठक आयोजित करण्यात येणार असून त्याला सरसंघचालक मोहन भागवत हजर राहणार आहेत. भागवत हे रविवारीच लखनऊमध्ये दाखल झाले आहेत.संघटनेची भविष्यातील रणनीती काय असावी, याचा निर्णय घेण्याबरोबरच विद्यमान स्थितीचा आढावाही घेण्यात येणार आहे.