काँग्रेस आणि भाजपला पर्याय देण्यासाठी लोकशाहीवादी आणि धर्मनिरपेक्ष शक्तींनी एकत्र येण्याचे आवाहन डाव्या पक्षांनी केले आहे. तसेच आपल्या सहभागाशिवाय राष्ट्रीय पातळीवर असा पर्याय उभारणे  कठीण असल्याचा दावा केला आहे. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, क्रांतिकारी समाजवादी पक्ष आणि फॉरवर्ड ब्लॉक या चार पक्षांच्या संयुक्त संमेलनात काँग्रेस आणि भाजपला पर्याय निर्माण करण्याबाबत चाचपणी करण्यात आली. या दोन्ही पक्षांची धोरणे सामान्य जनतेच्या हिताची नसल्याचा आरोप डाव्यांनी केला आहे. आगामी चार महिन्यांच्या कालावधीत कार्यकर्त्यांनी संघर्ष करावा. भाजप आणि काँग्रेसला पर्याय देण्यासाठी आम्ही आघाडी उभारू शकतो, मात्र यातून फारसे काही साध्य होत नसल्याचा आपला अनुभव असल्याचे मतही नोंदवण्यात आले. केवळ निवडणुकीसाठी नव्हे, तर लोकांना पर्यायी कार्यक्रम देऊन मूठभरांच्या फायद्यासाठी असलेली सरकारची धोरणे हाणून पाडणे गरजेचे असल्याचे माकप सरचिटणीस प्रकाश करात यांनी सांगितले. संयुक्त पुरोगामी आघाडी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी या दोन्हींमध्ये अंतर्विरोध असल्याने या दोन्ही आघाडय़ांचा प्रभाव झपाटय़ाने ओसरेल, असे भाकीत भाकपचे सरचिटणीस सुधाकर रेड्डी यांनी वर्तवले.