संसदेच्या पावसाळी अधिवेशनला सोमवार, १८ जुलैपासून सुरूवात होत आहे.  त्यापूर्वी  संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी रविवारी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला पंतप्रधान मोदींसह केंद्रीय मंत्री आणि सर्व पक्षांच्या नेत्यांनी उपस्थिती लावली.

‘जीएसटी हा देशासाठी महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. त्यामुळे देशाचे हित हे सगळ्यात आधी यायला हवे. याचे श्रेय कोणत्या सरकारला मिळते हे महत्त्वाचे नाही. या पावासाळी अधिवेशनात जीएसटीसारखी महत्त्वाची विधेयक मंजूर व्हायला हवीत’ वस्तू आणि सेवा कर (जीएसटी ) च्या मुद्दयावर पंतप्रधान मोदी सर्व पक्षाच्या नेत्यांना उद्देशून म्हणाले.

तसेच ‘संसदेत वस्तू व सेवा कर विधेयक मांडण्यात येत असताना काँग्रेसकडून अडवणूक केली जाणार नाही. देशाच्या कल्याणासाठी काँग्रेस कोणत्याही विधेयकाला पाठिंबा देईल’ असेही काँग्रेसचे नेते गुलामनबी आझाद यांनी स्पष्ट केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील जीएसटी विधेयक मंजूर करण्याबाबात सकारात्मकता दर्शविल्याबद्दल सर्व पक्षांचे आभार मानले.

‘अनेक राज्य जीएसटीच्या बाजूने असल्याने, तसेच कोणत्याही पक्षाचा या  विधेयकावर आक्षेप नसल्याने हे विधेयक पावसाळी अधिवेशनात नक्की मंजूर होईल’ असा विश्वास भाजप नेते वैंकया नायडू यांनी व्यक्त केला आहे.