टाळेबंदीला सहावी मुदतवाढ देण्यात आली असून, ती ३१ जुलपर्यंत कायम राहणार आहे. मात्र, या काळात निर्बंध आणखी शिथिल करण्यात आले असून, हा टाळेबंदीच्या परतीच्या प्रवासाचा दुसरा टप्पा असेल. रात्रीची संचारबंदीची वेळ कमी करण्यात आली असून आता ती रात्री १० ते पहाटे ५ पर्यंत असेल.

नव्या टप्प्यात आर्थिक व्यवहारांचा विस्तार केला जाईल. पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकाच वेळी येऊ शकतील, अशी मोठी दुकाने उघडली जाऊ शकतील. केंद्रीय व राज्य सरकारच्या प्रशिक्षण संस्था १५ जुलपासून सुरू होणार असून त्यासाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली जातील.

केंद्रीय गृहमंत्रालयाने सोमवारी टाळेबंदी शिथिलीकरण-२ साठी नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. नियंत्रित विभाग वगळता शहराच्या अन्य भागांमध्ये अधिकाधिक आर्थिक व्यवहारांना मुभा देण्यात आली आहे. देशांतर्गत प्रवासी विमानसेवा व रेल्वेसेवा यापूर्वीच सुरू झाली असून त्याचा अधिक विस्तार केला जाईल.

बंदच राहणार!

० शाळा- महाविद्यालये, शैक्षणिक संस्था ३१ जुपपर्यंत बंद राहतील. ऑनलाइन व दूरस्थ शिक्षणास मुभा.

० आंतरराष्ट्रीय विमानसेवा व मेट्रो.

० चित्रपटगृहे, जिन्मॅशियम, पोहण्याचे तलाव, मनोरंजन पार्क, नाटय़गृहे, बार, सभागृहे, समारंभ दालन व अन्य सार्वजनिक ठिकाणी

० सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक व मोठ्या जाहीर कार्यक्रम-समारंभांवर बंदी.

पंतप्रधानांचे आज भाषण

टाळेबंदी शिथिलीकरणाच्या नव्या टप्प्याच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी दुपारी ४ वाजता देशाला उद्देशून भाषण करणार आहेत. टाळेबंदीचा पाचवा टप्पा आज संपत आहे.