व्हॉट्सअॅपवरून फॉरवर्ड केलेला खोटा मेसेज केरळमधील एका तरुणीचं लग्न तुटण्यास कारणीभूत ठरला आहे. याप्रकरणी पोलिसांनी शिहाब (वय -35) या तरुणाला अटक केली आहे. तरुणीच्या फोटोचा गैरवापर करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

गेल्या आठवड्यात संबंधीत तरुणी तिच्या एका मित्रासोबत बस स्टॉपवर बोलत उभी होती. त्यावेळी आरोपीने तिचा लपून फोटो काढला. या फोटोसोबत त्याने ऑडिओ क्लिप रेकॉर्ड करून व्हायरल केली. ही तरुणी या मुलासोबत पळून जाण्याचा कट रचत आहे अशा आशयाची ही ऑडिओ क्लिप होती. त्यानंतर आरोपीने हा मेसेज तरुणीच्या घरच्यांनाही पाठवला आणि यामध्ये हस्तक्षेप करण्यास सांगितलं.

thenewsminute.com ने दिलेल्या वृत्तानुसार, केरळमधून व्हायरल झालेला हा मेसेज लवकरच इतर देशांमध्ये पोहोचला. ज्या तरुणासोबत त्या तरुणीचं लग्न ठरलं होतं त्याच्याकडेही हा मेसेज पोहोचला आणि त्यानंतर त्याने लग्न तोडण्याचा निर्णय घेतला. यानंतर संबंधीत तरुणीने पोलीस तक्रार करण्याचा निर्णय घेतला. तक्रारीनंतर अखेर शनिवारी पोलिसांनी तरुणाला बेड्या घातल्या.